जळगाव – येथील रामगदेववाडीजवळ एका भीषण अपघातामध्ये तीन बालकांसह महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील महिला आणि तिच्या दोन बालकांसह एका मुलाचा जागीच मृत्यू झाला. मयत चारही जण हे एकच कुटुंबातील आणि रामदेववाडी गावातील रहिवासी असल्याची माहिती समजत आहे.

राणी सरदार चव्हाण (३०), सोमेश सरदार चव्हाण (२), सोहन सरदार चव्हाण (७), सर्व रा. रामदेववाडी, जळगाव असे मयत आई व मुलांचे नाव आहे. त्यांचा परिवार मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतो. मंगळवारी दि. ७ मे रोजी राणी चव्हाण या दोन्ही मुले सोहन व सोमेश चव्हाण आणि लक्ष्मण भास्कर राठोड (१२) यांच्यासह जळगावी कामानिमित्त निघाल्या होत्या. गावाच्या बाहेर आल्यावर अचानक आलेल्या एम एच १९ सी.व्ही. ६७६७ या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात तिन्ही मुले एका बाजूला फेकल्या गेल्या. त्यात राणी चव्हाण व सोमेश या रस्त्यावर आपटून जागीच ठार झाल्या. त्यासह डोक्याला मार लागल्याने सोहन याचादेखील मृत्यु झाला.
दरम्यान घटनास्थळी अपघात झाल्याची माहिती मिळताच जमावाने रास्ता रोको केला. या ठिकाणी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र जमाव प्रक्षुब्ध झालेला होता. यामुळे चार तास राणी चव्हाण व सोमेश यांचा मृतदेह घटनास्थळीच होता. घटनास्थळी जमावाने दगडफेक सुरू केल्याने पोलिसांनी दंगा नियंत्रण पथकाच्या दोन प्लाटून बोलावल्या. त्यानंतर काही वेळाने पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणून जमावाला शांत करण्यात यश मिळाले. या दगडफेकीत दंगा नियंत्रण पथकाचे उमेश ज्ञानोबा गायकवाड (३०) आणि एक महिला पोलीस जखमी झाले आहे. दरम्यान, दगडफेकीप्रकरणीदेखील गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.