तमन्ना भाटिया अडचणीत! आयपीएलचं अवैध स्ट्रीमिंग केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलने बजावलं समन्स

अभिनेत्री तमन्ना भाटियासमोरच्या अडचणी वाढत आहेत. आधीच महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणी चौकशी सुरू असताना आता महाराष्ट्र सायबर सेलने तमन्नाला समन्स बजावलं आहे.

तमन्नाने 2023 साली आयपीएलचा सामना फेअरप्ले या अ‍ॅपवर लाईव्ह स्ट्रीम केला होता. यामुळे व्हायाकॉम कंपनीला कोट्यवधींचं नुकसान झालं होतं. याप्रकरणी तिला 29 एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.

फेअरप्ले अ‍ॅप हे महादेव बेटिंग अ‍ॅपचीच एक सब्सिडरी आहे. याच प्रकरणात अभिनेता संजय दत्तला देखील 23 एप्रिल रोजी चौकशीला बोलावण्यात आलं होतं. मात्र, संजय दत्त चौकशीला उपस्थित राहिला नाही. आपण भारतात नसल्याचं सांगून, आपलं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी त्याने काही अवधी मागितल्याचं सांगण्यात येत आहे.

फेअरप्ले अ‍ॅपचं प्रमोशन केल्यामुळे तमन्नाला चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. या प्रकरणी एक साक्षीदार म्हणून तिचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं जाईल. या अ‍ॅपच्या प्रमोशनसाठी कुणी संपर्क साधला, आणि तिला यासाठी किती रुपये मिळाले असे प्रश्न तिला विचारले जाण्याची शक्यता आहे. याप्रकरणी आतापर्यंत रॅपर बादशहाचं स्टेटमेंट देखील घेण्यात आलं आहे.