नवरी जाेमात अन् नवरदेव कोमात, दागिने घेऊन नववधूच झाली पसार

जळगाव – अकोला येथील नववधूने विवाह करून सासरी आल्यावर घरचे सगळे साखर झोपत असताना विवाहाप्रसंगी देण्यात आलेले सर्व सोन्याचे दागिने घेऊन पसार झाली आहे. याबाबत शनिपेठ पोलिसांमध्ये विवाह जुळवणारे, नववधू व तिच्या मैत्रिणी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महानगरपालिकेत व्हॉलमन म्हणून नोकरीस असलेले शरद काशिनाथ चौधरी यांचा मुलगा मयुर याचे यंदा कर्तव्य होते. त्यानुसार त्यांना विवाहाबाबत गेल्या १३ फेब्रुवारी रोजी पूजा विजय माने या महिलेचा फोन आला. समोरील पार्टीने आमच्याकडे विवाहयोग्य मुलगी असून तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे येवून स्थळ बघण्याचा कार्यक्रम उरकून घ्या, असे सांगण्यात आले. मुलगी पाहिल्यानंतर पसंती झाली. मात्र माने या महिलेने नवरा मुलाकडे दोन लाखांची मागणी केली. परंतु चौधरी यांनी आम्ही केवळ एक लाख रुपये देण्यास तयार असल्याचे सांगत पुढील विवाहाची तयारी सुरु झाली.

त्यानंतर दि. १६ एप्रिल रोजी तरसोद येथील गणपती मंदिरात नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये मयूर चौधरी याचे नंदीनी गायकवाड या तरुणीसोबत विवाह संपन्न झाला. यावेळी मुलीकडून पूजा माने, नंदीनीची मैत्रीण नीता अर्जुन गणवार, मावशी, मुलीचा मावसभाऊ असे वऱ्हाडी मंडळी हजर होते. विवाह संपन्न झाल्यानंतर चौधरी यांनी पूजा माने या महिलेला विवाह लावून देण्याबाबत ठरल्याप्रमाणे एक लाख रुपये सुपूर्त केले.

विवाह संपन्न झाल्यानंतर सायंकाळी सर्व मंडळी सासरी घरी परतले. विवाहाचा दिवसभराचा थकवा आल्यामुळे रात्री सर्वांना साखर झोप लागली. या संधीचा फायदा घेत बुधवार (दि.१७) रोजी पहाटेच्या सुमारास नववधू नंदीनी व तिची मैत्रीण या घरात आढळून आल्या नाही. त्यामुळे चौधरी कुटुंबियांनी त्यांचा परिसरात शोध घेतला. परंतु त्या दोघी मिळून आल्या नाहीत. त्यानंतर शेजारी राहणाऱ्या महिलेने सांगितले की, पहाटेच्या सुमारास एक काळ्या रंगाच्या चारचाकीत बसून नववधू व तिच्या मैत्रीणीला जाताना पाहिले आहे. त्यानंतर चौधरी यांना घरात सोन्याचे दागिने देखील चोरीला गेल्याचे लक्षात आल्याने याप्रकरणी विवाह जुळविणाऱ्या पूजा विजय माने (वय-३२, रा. महाडीकवाडी, सांगली), नववधू नंदीनी राजू गायकवाड (रा. अकोला), तिची मैत्रीण नीता अर्जुन गणवार यांच्याविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.