मुख्यमंत्री अडचणीत; इतिहासाची मोडतोड प्रकरणी कायदेशीर नोटीस

मुंबई – वांद्रे-बीकेसी येथील दसरा मेळाव्यात केलेल्या वक्तव्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. इतिहासाची मोडतोड करून हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी दोन नागरिकांनी अॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. इतकंच नाहीतर सात दिवसांत जाहीर माफी मागा, अन्यथा पुढील कायदेशीर कार्यवाही करू, असा इशारा नोटिसीतून एकनाथ शिंदे यांना देण्यात आला आहे.

वांद्रे-बीकेसी येथील दसरा मेळाव्यात महादजी शिंदे आणि दत्ताजी शिंदे हे छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर लढले व शहीद झाले, पण मागे हटले नाही, असा उल्लेख एकनाथ शिंदे यांनी केला होता. यानंतर त्यांनी गुढीपाडवा हा सण प्रभू रामचंद्राने रावणावर मिळवलेल्या विजयानिमित्त साजरा करतात, असेही म्हटले होते. मुख्यमंत्र्यांच्या या दोन्ही विधानांमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. इतिहासाची मोडतोड करणाऱ्या आणि धर्मभावना दुखावणाऱ्या या विधानांबद्दल पुढील सात दिवसांत जाहीर माफी मागा तसेच लेखी माफीनामा पाठवा, अन्यथा पुढील कायदेशीर कार्यवाही करू, असा इशारा एकनाथ शिंदे यांना देण्यात आला आहे. सौरभ ठाकरे आणि तेजस बैस यांनी अॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या नोटिसीत काय?

सौरभ ठाकरे आणि तेजस बैस यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या नोटिसीत म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर महादजी शिंदे यांचा जन्म 50 वर्षांनी झाला, तर दत्ताजी शिंदे यांचा जन्म 43 वर्षांनी झाला. पण मुख्यमंत्री पदावर असूनही बुद्धीला ताण देऊन 40-50 वर्षांनी जन्मलेल्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही त्यांच्यासोबत लढाईला पाठवले हा पराक्रम आपणच करू शकता. अशी इतिहासाची मोडतोड अक्षम्य स्वरूपाची आहे. तर गुढीपाडवा हा सण प्रभू रामचंद्राने यांनी रावणावर मिळवलेल्या विजयानिमित्त साजरा केला जातो, हे आपले विधान अत्यंत हास्यास्पद आणि आमची मान खाली घालायला लावणारे आहे. प्रभू श्रीरामाने रावणावर विजय मिळवला तो दिवस दसरा म्हणून साजरा केला जातो. शाळेत जाणाऱ्या प्रत्येक मुलालाही ही बाब माहीत आहे, पण तुम्ही गुढीपाडव्याला दसऱ्याचे नाव देऊन हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत, अशा शब्दात सौरभ ठाकरे आणि तेजस बैस यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे.