राज्यात तापमान वाढीसह गारपीटीचीही शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

राज्यात आता तापमानात चांगलीच वाढ होत आहे. एप्रिल महिन्यात अनेक जिल्ह्यात उकाडा असह्य होत आहे. तसेच मुंबई आणि परिसरात आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने घामाच्या धारा निघत आहेत. वातावरणात सध्या बदल होत असल्याने मार्च महिन्यात काही जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. आता एप्रिल महिन्यातही ऐन गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत काही जिल्ह्यात पावसासह गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

राज्यातील कमाल तापमान वाढत असतानाच हवामानातील बदल, वेस्टर्न डिस्टबन्स, आर्द्रतेचे वाढलेले प्रमाण यामुळे राज्यातील काही जिल्ह्यात रविवार ते बुधवारदरम्यान हलक्या पावसासह गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई आणि परिसरात उकाडा वाढणार आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. तर विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसासह गारपीटीची शक्यता आहे.

राज्यासह देशातही तापमानात वाढ होत आहे. 12 राज्यांत उष्णतेची लाट असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशा व पश्चिम बंगालमध्ये सरासरी तापमान 43 अंशांवर पोहोचले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, केरळ व सिक्कीममध्ये हलक्या पावसाची, तर जम्मू कश्मीर आणि हिमाचल प्रदेशात हिमवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य प्रदेशात काही जिल्ह्यांत गारांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. त्यामुळे उष्णतेपासून बचावासाठी योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.