नितीन गडकरी यांचा निर्धार “देशातील पेट्रोल, डिझेलवर चालणारी सर्व वाहने हद्दपार करणार’; 

भारताला हरित अर्थव्यवस्था बनविण्याची आमची महत्वाकांक्षी योजना असून त्या अंतर्गत देशात पेट्रोल आणि डिझेल या इंधनावर चालणारी वाहने हद्दपार करण्याचा आमचा निर्धार आहे असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

देशात हायब्रिड वाहनांना चालना देण्यासाठी या वाहनांवरील जीएसटी कमी केला जाईल असे त्यांनी म्हटले आहे.

भारताला पेट्रोल आणि डिझेल गाड्यांपासून पूर्णपणे मुक्त करणे शक्य आहे का, या प्रश्‍नाला उत्तर देताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री गडकरी म्हणाले, “शंभर टक्के” हे शक्य आहे. पण हे अवघड असले तरी अशक्य नाही. हे माझे व्हिजन आहे, असे गडकरी एका मुलाखतीत म्हणाले.

ते म्हणाले की, भारत इंधन आयातीवर १६ लाख कोटी रुपये खर्च करतो. हा पैसा शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी वापरला जाईल, गावे समृद्ध होतील आणि तरुणांना रोजगार मिळेल. मात्र गडकरींनी हे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कोणतीही कालमर्यादा दिली नाही.

हायब्रीड वाहनांवरील जीएसटी पाच टक्के आणि फ्लेक्स इंजिनसाठी १२ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे, या मागणीवर विचार सुरू आहे असे गडकरी म्हणाले. जैवइंधनाच्या वापराला चालना देऊन देश इंधनाची आयात थांबवू शकतो, असा आमचा ठाम विश्वास असल्याचे मंत्री म्हणाले.

गडकरी म्हणाले की ते २००४ पासून पर्यायी इंधनासाठी प्रयत्न करत आहेत आणि येत्या पाच ते सात वर्षात गोष्टी बदलतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हे परिवर्तन घडण्यासाठी मी तुम्हाला तारीख आणि वर्ष देऊ शकत नाही कारण ते खूप कठीण आहे. हे अवघड आहे पण अशक्य नाही, असे गडकरी यांनी ठामपणे सांगितले.