ब्रेकिंग! अहमदनगर शहराचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्या नगर

अहमदनगर शहराचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्यास आज बुधवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

अहमदनगर शहराचे नामकरण अहिल्यानगर

अहमदनगर शहराचे तसेच जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. अहमदनगर शहराचे नाव बदलण्याची मागणी अनेक लोकप्रतिनिधी, नागरिक व संघटनांनी केली होती. या संदर्भात विभागीय आयुक्त, नाशिक यांच्याकडून माहिती मागविण्यात येऊन अहमदनगर महानगरपालिका प्रशासनाचा ठरावदेखील राज्य शासनास प्राप्त झाला होता. या अनुषंगाने गृह मंत्रालयाच्या सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार हे नामकरण करण्याची शिफारस करण्यात आली असून केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर अहमदनगर जिल्हा, तालुका तसेच महानगरपालिका यांच्या नामांतरणाची कार्यवाही महसूल व नगर विकास विभागाकडून करण्यात येणार आहे.

मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यासही सरकारने मान्यता दिली आहे. तसेच पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात आली आहे. आता पोलीस पाटलांना महिन्याला १५ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. तसेच आशा स्वयंसेविकांच्या मानधनात भरीव पाच हजार रुपयांची वाढ करण्याचेही सरकारने ठरवले आहे.

 

jalgaonsandesh

jalgaonsandesh