भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीवरील १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

जळगाव – शहरातील आसोदा रोडवरील भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरच्या धडकेत दुचाकीवरील १३ वर्षीय मुलगा जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवार ८ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान घडली आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकच आक्रोश केल्याचा पाहायला मिळाले याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रोहण कैलास पाटील (१३, रा. चिंचोली, ता. जळगाव) असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे

जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील मजुरी करणारे कैलास पाटील यांचा मुलगा रोहण कैलास पाटील व त्याचा मावस भाऊ अक्षय संदीप इखे (२६, रा. चिंचोली, ता. जळगाव) हे दोघे जण शुक्रवारी दुपारी आसोदा येथे दुचाकीने (एमएच १९, डीएफ ६५०१) गुरांसाठी चारा पाहण्यासाठी गेले होते. तेथून दोघे जण परतत असताना लेंडी नाला पुलाच्या अगोदरच समोरुन येणाऱ्या डंपरची (एमएच १५, एके ३७२३) दुचाकीला धडक बसली. त्यात अक्षय इखे हा रस्त्याच्या कडेला फेकला गेला तर रोहण हा मागच्या चाकाखाली आला. त्यामुळे तो जागीच ठार झाला.

अपघात होताच चालक डंपर जागेवर सोडून पसार झाला. पोलिसांनी डंपर ताब्यात घेतले आहे.

कष्टकरी पाटील दाम्पत्याला एक मुलगी असून रोहण हा एकुलता एक मुलगा होता.