‘चिट्ठी आई है’ गाण्यामागचा आवाज हरपला! गझल गायक पंकज उधास यांचं निधन

वयाच्या 72 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई – आपल्या जादूई आवाजाने मागील अनेक दशके रसिकांच्या मनावर राज्य करणारे गझल गायक पंकज उधास  यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मुलीने सोशल मीडियावर एक पोस्ट करत त्यांच्या निधनाबाबतची माहिती दिली.

मागील काही दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात पंकज उधास यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज सकाळी ११ वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पंकज उदास यांनी गायलेली अनेक गाणी, गझल आजही संगीतप्रेमींच्या ओठांवर आहेत. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टी आणि संगीत क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पंकज उधास यांनी गझल गायकीच्या क्षेत्रात आपले एक स्थान निर्माण केले. १९८० मध्ये ‘आहत’ नावाच्या अल्बमच्या मार्फत त्यांनी आपल्या यशस्वी कारकीर्दीची सुरुवात केली. या अल्बमने त्यांना व्यावसायिक यशाचे दरवाजे खुले झाले. गझल गायक म्हणून यश मिळवल्यानंतर, महेश भट्ट यांच्या ‘नाम’ या चित्रपटात पंकज उधास दिसले होते. त्यानंतर अनेक हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. जगभरातील अल्बम आणि लाइव्ह कॉन्सर्टमुळे त्यांना गायक म्हणून प्रसिद्धी मिळाली.

कशी होती पंकज उधास यांची कारकीर्द?

पंकज उधास यांचा जन्म गुजरातमधील जेतपूर येथे झाला. तीन भावांमध्ये ते सर्वात लहान होते. त्यांचा मोठा भाऊ मनहर उधास याने बॉलीवूड चित्रपटांमध्ये हिंदी पार्श्वगायक म्हणून काही यश मिळवले. त्यांचे दुसरे मोठे बंधू निर्मल उधास हे देखील प्रसिद्ध गझल गायक आहेत. त्यांची आणि त्यांच्या भावांची संगीतातील आवड पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांना राजकोटच्या संगीत अकादमीमध्ये दाखल केले. उधास यांनी सुरुवातीला तबला शिकण्यासाठी नाव नोंदवले पण नंतर त्यांनी गुलाम कादिर खान साहेबांकडून हिंदुस्थानी गायन शास्त्रीय संगीत शिकण्यास सुरुवात केली. यानंतर पंकज उधास ग्वाल्हेर घराण्याचे गायक नवरंग नागपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबईला गेले. मुंबईत आल्यानंतर पंकज यांनी सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई येथे शिक्षण घेतले.

पंकज उधास यांचे पहिले गाणे उषा खन्ना यांनी संगीतबद्ध केलेले आणि नकाश लायलपुरी यांनी लिहिलेले “कामना” चित्रपटातील होते, हा चित्रपट फ्लॉप ठरला होता पण त्यांच्या गायनाचे खूप कौतुक झाले होते. त्यानंतर, पंकज उधास यांना गझलची आवड निर्माण झाली आणि गझल गायक म्हणून करिअर करण्यासाठी ते उर्दू शिकले. कॅनडा आणि अमेरिकेत त्यांनी दहा महिने गझल मैफिली केल्या आणि नव्या जोमाने आणि आत्मविश्वासाने ते भारतात परतले.

घूंघट, मुस्कान, धड़कन, नशा, आफरीन, आहट, मुकर्रर, तरन्नुम, महफ़िल, शामखाना, पंकज उधास अल्बर्ट हॉल में लाइव असे त्यांचे अनेक अल्बम गाजले. त्यांनी गायलेले ‘चिट्ठी आई है’ हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे. त्यांचे जवळजवळ ५० हून अधिक अल्बम रिलीज झाले आहेत आणि त्यांनी चित्रपटांतून शेकडो गाणी गायली आहेत. २००६ साली संगीत क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या निधनाने संगीतसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.