जरांगे पाटील उपोषणावर आणि मंत्री नाचतायत रस्त्यावर, संजय राऊत यांचे जहाल टीकास्त्र

मराठा आरक्षणाचा मुद्दा, लोकशाहीची रोज होत असलेली गळचेपी यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली. उद्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था निर्माण झाली तर सरकार गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्याप्रमाणे वरातीत नाचणार आहेत का? असा सवाल राऊत यांनी केला आहे.

दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी म्हटले की, “माझ्या माहितीप्रमाणे दुपारी बारा वाजता जरांगे पाटलांनी त्यांच्या राज्यातल्या प्रमुख लोकांची बैठक बोलावली आहे आणि त्यात ते पुढील आंदोलनाची दिशा मांडतील. याचा अर्थ असा आहे की, मंगळवारी जो सरकारने फसवणुकीचा प्रकार केला 10 टक्के आरक्षणाचा तो मराठा समाजाला अजिबात मान्य नाही त्यांना वाटतंय त्यांची फसवणूक झाली. सरकार त्यांचे समाधान करण्यात अपयशी ठरलेले आहे. अशावेळी उद्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था निर्माण झाली तर सरकार गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्याप्रमाणे वरातीत नाचणार आहेत का? हा प्रश्न आहे. मंत्री नाचतायत रस्त्यावर. जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे, मराठा समाज अस्वस्थ आहे हे असे नाचून प्रश्न सुटणार आहेत का?”

एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची घेतलेली शपथ खोटी आहे. बाळासाहेब ठाकरेंची त्यांनी अनेकदा शपथ घतेलेली आहे. या लोकांनी आम्ही शिवसेना सोडणार नाही म्हणून कितीवेळा शपथ घेतलेली आहे. बाळासाहेबांच्या समाधीसमोर, बाळासाहेबांच्या मातोश्रीवर खुर्चीसमोर उभं राहून यांच्या शपथांवर काय विश्वास ठेवताय? अशी टीका राऊत यांनी केली.

शेतकरी आंदोलनाबाबत संजय राऊत म्हणाले, शेतकऱ्यांच्या आंदोलनातील मिनीमम सपोर्ट प्राईज (किमान हमी भाव) हा त्यातला अत्यंत महत्वाचा मुद्दा हा देशभरातला आहे. मी दोन दिवस दिल्लीत असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावतीने शेतकऱ्यांच्या काही नेत्यांशी चर्चा केली. एमएसपी संदर्भात ज्या पाच शेतमालाविषयी पियुष गोयल यांनी प्रस्ताव ठेवलेला आहे तो शेतकऱ्यांनी फेटाळला आहे. कारण संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांसाठी ते योग्य नाही. कापूस असेल, उडीद असेल, मका असेल, महाराष्ट्रात द्राक्ष आहे, कांदा आहे , कापूस आहे, महाराष्ट्रातील शेतीचा प्रश्न हा अत्यंत गंभीर आहे. देशातल्या राज्यांनुसार शेतकऱ्यांचे प्रश्न आणि उत्पादने वेगळी आहेत. अशावेळी देशातल्या शेतकरी नेत्यांनी एकत्र यावे आणि या विषयावरती एकत्र येऊन सरकारकडे मागणी करावी अशी त्या शेतकऱ्यांची भूमिका आहे. शेतकरी जरी बॉर्डर ओलांडून पुढे गेले तर त्यांच्यावर गोळ्या झाडण्याची तयारी सरकारने केलेली आहे असा गंभीर आरोपही राऊत यांनी केला.