सगेसोयऱ्याच्या बाबतीत निर्णय नाहीच! मुख्यमंत्री म्हणाले, त्याच्या डिटेल्समध्ये जाणार नाही

मंबई – मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावलेलं आहे. मंगळवारी दुपारी एक वाजता मराठा आरक्षणाचा प्रस्ताव विधीमंडळाच्या पटलावर मांडला. तो मंजूर झाल्यानंतर विधेयकावर सभागृहात चर्चा सुरु झाली.

सुरुवातीला आरक्षणावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आजचा निर्णय हा मराठा आंदोलकांच्या एकजुटीचा विजय आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी उभ्या केलेल्या लढ्याला यश येत आहे. लाखो मराठा बांधवांसाठी आजचा  दिवस इच्छापूर्तीचा आणि ऐतिहासिक आहे.

”मी सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे मला आंदोलकांच्या भावना लक्षात येतात. मराठा आरक्षणामुळे कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशी काळजी सरकारने घेतली आहे.”

शिंदे पुढे म्हणाले की, जेव्हा मराठा आंदोलकांचं उपोषण सोडण्याची वेळ आली तेव्हा-तेव्हा मी आंदोलकांना भेटलेलो आहे. मी मुख्यमंत्री आहे म्हणून प्रोटोकॉल पाळत नाही. बाळासाहेबांच्या शिकवणीवर चालणारा मी कार्यकर्ता असून स्वतःपेक्षा जनतेला प्राधान्य देण्याचं काम मी करतो.

सगेसोयऱ्याचा मुद्द्यावर मुख्यमंत्री म्हणाले…

कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाने गतीने काम करण्यास सुरुवात केली असून मराठवाड्यात पुरावे शोधण्याचंही काम सुरु आहे. सगेसोयऱ्यांच्या बाबतीत जी अधिसूचना सरकारने काढलेली होती त्यावर ६ लाख हरकती आलेल्या आहेत. त्या हरकतींची छाननी सुरु आहे. त्यावर काम सुरु असून त्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल. आज मी त्याच्या डिटेल्समध्ये जाणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.