ट्रकची दुचाकीला धडक; 2 जणांचा जागीच मृत्यु 

भुसावळ – जळगावच्या दिशेकडे जाणाऱ्या दुचाकीस भरधाव ट्रॅकने मागील बाजूने धडक देत दोघांना चिरडून तब्बल चौदा किलोमीटर दुचाकी ओढत नेल्याचा प्रकार गुरुवारी (ता. १५) सायंकाळी सहाच्या दरम्यान घडला.

या घटनेत दोघे दुचाकीस्वार जागीच ठार झाले आहे. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील चाहेल ढाब्यासमोर लावण्यात आलेल्या किलोमीटर अंतर दर्शविणाऱ्या फलकाजवळ घडला.

जळगावच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीस भरधाव ट्रकने (क्रमांक : आरजी ११, जीजे ९९०३) मागील बाजूस धडक देऊन दुचाकीस्वार जितेंद्र राठोड (वय अंदाजे ४०, रा. जळगाव, पूर्ण पत्ता माहीत नाही) तर सोबत असणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीचे नाव माहीत नाही, अशांना ट्रकचालकाने चिरडले.

दुचाकी ट्रकच्या समोरील दोघा चाकांच्या मधोमध अडकल्याने ट्रकचालकाने तब्बल दुचाकी चौदा किलोमीटर ओढून नेली. अखेर नशिराबाद टोलनाक्याजवळ पोलिसांनी ट्रक थांबवून ट्रकचालक व किन्नर या दोघांना ताब्यात घेतले.

दुचाकीस्वार मृत झालेल्या दोघांना राष्ट्रीय महामार्ग रुग्णवाहिकेमधून ट्रामा केअर सेंटरमध्ये विच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. उशिरापर्यंत बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.