जळगाव – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जय्यत तयारीला सुरुवात केली आहे. प्रत्येक पक्षाकडून आढावा घेतला जात आहे. मतदारसंघांवर दावा केला जात आहे. राज्यात सध्या राजकीय गणितं बदलली असल्याने शेवटच्या क्षणापर्यंत कोणता नेता कुठल्या पक्षात जाणार?
याची सगळ्यांना उत्सुकता आहे.
जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार ) नेते एकनाथ खडसे यांनी दावा केला आहे, तर दुसरीकडे हा बाल्लेकिल्ला भाजपचा असल्याने त्यांनीही दावा केला आहे. एकनाथ खडसेंची सून रक्षा खडसे या विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे भाजप या मतदारसंघात आता कोणाला उमेदवारी देणार? याकडे लक्ष असेल.
रावेर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट लढविणार आहे. आपणच त्या ठिकाणी उमेदवारीला असणार आहोत. Sharad Pawar तिथून निवडणूक लढणार नाहीत, अशी माहिती पक्षाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी दिली.
रावेरसाठी शरद पवार गटाची तयारी
रावेर मतदारसंघवार आता शरद पवार गटाने दावा केला आहे. भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे यांनी हा मतदारसंघ लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यासाठी त्यांनी शरद पवारांची भेट घेतली. आपल्याला ही जागा लढवायची इच्छा असल्याचे त्यांनी शरद पवारांना सांगितलं आणि पवारसाहेबांनी देखील त्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता रावेर मतदारसंघावर कोणाची उमेदवारी निश्चित होते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या रक्षा खडसे यांनी बाजी मारली होती. त्यांनी काँग्रेसच्या उल्हास पाटील यांचा पराभव केला होता. या मतदारसंघात भाजपकडून एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे विरुद्ध काँग्रेसकडून उल्हास पाटील अशी लढत झाली होती.
रावेर लोकसभा मतदारसंघात गेल्यावेळी 61.40 टक्के मतदानाची नोंद झाली होती. सन 2014 मध्ये रावेर मतदारसंघात 63.48 टक्के मतदान झाले होते. मात्र, आता एकनाथ खडसे यांनी या मतदारसंघाची मागणी केली आहे, तर मात्र ही लढत प्रतिष्ठेची होणार आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( शरदचंद्र पवार ) अशी ही लढत होईल.
जळगावची जागा उद्धव ठाकरेंसाठी सोडली
जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघांच्या महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत दोन दिवसांत निर्णय होणार आहे. सद्यःस्थितीत दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे आहेत; परंतु आता जळगाव लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत ठाकरे गटाने लढण्याची इच्छा व्यक्त केली. त्या दृष्टीने तयारीही सुरू केली. पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी जळगाव जिल्ह्याचा दौरा करून जळगाव लोकसभा मतदारसंघात चार सभा घेतल्या. जळगाव लोकसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत भाजपचे उन्मेष पाटील यांनी काँग्रेसच्या गुलाबराव देवकरांचा पराभव केला होता.
निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढवण्याचा निर्णय तिन्ही पक्षांनी घेतला आहे. त्यासाठी तडजोडदेखील करण्याची तयारी तिन्ही पक्षांनी दाखवली आहे. याच पार्श्वभूमीवर जळगाव लोकसभा मतदारसंघावरचा दावा राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंच्या पक्षासाठी सोडला असल्याची माहिती मिळाली आहे. येत्या काही दिवसांत जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला जाईल आणि जागांचा तिढादेखील लवकरात लवकर सुटणार आहे.