शासनाकडून जाहिरात प्रसिध्द; राज्यातील शिक्षकांच्या २१ हजार ६७८ पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा

मुंबई – राज्यातील शिक्षक पदाच्या भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्य शासनाकडून भरतीसंदर्भात जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून शालेय शिक्षण विभागातर्फे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या व खाजगी शिक्षण संस्थांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

या जाहिरातीमुळे गेले काही महिने प्रलंबित शिक्षक भरतीबाबत उमेदवारांची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे.

दरम्यान, या भरतीच्या माध्यमातून महापालिका (स्थानिक स्वराज्य संस्था) आणि खासगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांच्या एकूण २१ हजार ६७८ रिक्त पदांच्या भरतीची मागणी केली आहे. त्यानुसार, अखेर मुलाखतीशिवाय १६ हजार ७९९ आणि मुलाखतीसह चार हजार ८७९ पदांची भरतीची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यातील सर्व पालिका आणि खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टलद्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीसाठी ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी-२०२२’ ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती.