शशी थरुर यांची पंतप्रधानांवर खोचक टीका ‘पीएम मोदींना काय झालंय? ते थकले आहेत का?’,

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (5 फेब्रुवारी) लोकसभेत काँग्रेसवर जोरदार टीका केली.

यावेळी त्यांनी इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरुंच्या काही विधानांचाही उल्लेख केला. त्यावर आता काँग्रेस नेते शशी थरुर यांची प्रतिक्रिया आली आहे.

‘नेहरुंबद्दल किती दिवस बोलणार?’

शशी थरुर म्हणाले, “पंतप्रधान मोदींच्या भाषणाचा आम्ही खूप आदर करतो. पण, पंतप्रधान पुन्हा पुन्हा तेच भाषण करत आहेत. मला कळत नाही की, त्यांना नेमकं काय झालंय? ते थकले आहेत का? नेहरुंजींच्या मृत्यूला 60 वर्षे झाली आहेत. पंतप्रधान मोदी त्यांच्यांबद्दल आणखी किती दिवस बोलणार? लोकसभेतील हे त्यांचे शेवटचे भाषण होते, त्यांनी काहीतरी नवीन बोलायला हवे होते,” असा टोमणा थरुर यांनी लगावला.

नेहरुंबद्दल पंतप्रधान मोदी काय म्हणाले ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत म्हणाले, “पंतप्रधान नेहरुजींचे नाव घेतले तर त्यांना काँग्रेसला वाईट वाटते. जम्मू-काश्मीर आणि देशातील जनतेला नेहरुंच्या चुकांची मोठी किंमत चुकवावी लागली. 15 ऑगस्ट रोजी नेहरुंनी लाल किल्ल्यावरून सांगितले होते की, भारताला सामान्यतः कठोर परिश्रम करण्याची सवय नाही. युरोप, जपान, चीन, रशिया किंवा अमेरिकेतील लोक जेवढे काम करतात, तेवढे आपण करत नाही. भारतीयांबद्दल नेहरुंजींचे विचार हे होते की, भारतीय आळशी आहेत आणि त्यांची बुद्धिमत्ता कमी आहे.”