काही लोकांना ‘ध’ चा ‘मा’ करायची सवयच असते!

अजित पवारांनी कोणावर साधला निशाणा?

मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्यासंबंधी केलेल्या वक्तव्यामुळे शरद पवार गटातील नेत्यांकडून टीका होत होती. बारामती दौऱ्यावर असताना ‘शेवटची निवडणूक आहे, असं भावनिक आवाहन तुम्हाला केलं जाईल, मात्र कधी शेवटची निवडणूक असेल काय माहीत? असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला होता.

या वक्तव्यामुळे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ‘अजित पवार यांनी आज हद्द ओलांडली. काकाच्या मृत्यूची ते वाट पाहतायत’, अशी टीका केली होती. यावर अजित पवारांनी माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला असं म्हणत एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी आपल्या वक्तव्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

अजित पवार यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, ”काल माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. माझं पहिल्यापासून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असल्यापासून एवढंच म्हणणं होतं की, ज्येष्ठ नेत्यांनी शारीरिक दगदगीचा विचार करावा आणि प्रकृतीची काळजी घ्यावी. हे मत मी पूर्वी देखील मांडलेलं आहे.

मात्र, काही लोक स्वतःच्या राजकारणासाठी ज्येष्ठ नेत्यांचा वापर करू पाहतात. त्यांना ह्या गोष्टी कळणार नाहीत. माझ्या त्यांच्याबद्दलच्या भावना मी वेळोवेळी मांडलेल्या आहेत. पण काही लोकांना ‘ध’ चा ‘मा’ करायची सवयच असते, अशा नाटकीबाज लोकांना मी महत्त्व देत नाही. मात्र सर्वसामान्य लोकांना माझ्या भावना कळाव्यात, म्हणून मी हे म्हणणं मांडत आहे”, असं म्हणत अजित पवारांनी शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधला.