शिक्षण संचालकांचा परीक्षांवर बहिष्कार, दहावी बारावीच्या परीक्षांवर मोठं संकट !

मुंबई – दहावी बारावीच्या परीक्षा तोंडावर आलेल्या असताना शिक्षण संचालक मंडळाकडून या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंडळाने 2012 पासून राज्यातील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांच्या मागणीसह अनेक मागण्यांसाठी शिक्षण संचालक मंडळांनी हा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

त्यामुळे आता राज्य सरकारसमोर परीक्षा घेण्याबाबत पेच निर्माण झाला आहे. यातून सरकार काय तोडगा काढणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शिक्षण संचालक मंडळांनी दहावी बारावी परीक्षांवर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयासोबतच या दोन्ही इयत्तेतील प्रात्यक्षिक परीक्षांचे साहत्य स्वीकारण्यास देखील नकार दिला आहे. तसेच या दोन्ही परीक्षा काही दिवसांवर आलेल्या असताना त्यासाठी कर्मचारी आणि शाळांच्या इमारती देखील न देण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत सरकार आमच्या प्रलंबित मागण्यांबद्दल निर्णय घेत नाही. तोपर्यंत आम्ही दहावी बारावीच्या परीक्षांच्यां केंद्रांसाठी शाळा उपलब्ध करून देणार नाही अशी भूमिका महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने घेतली आहे. या आक्रमक पवित्र्यामुळे दहावी बारावी परीक्षांवर संकट निर्माण झाले आहे.

काय आहे शिक्षण संचालक मंडळाची भूमिका?

महाराष्ट्र शासनाकडे व्यवस्थापनच्या शाळांसंबंधीच्या ज्या मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत आहे, त्यासंबधी चर्चा करण्यासाठी शिक्षण संचालक मंडळांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्वानुमते आगामी दहावी आणि बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला होता. परंतु त्यानंतरही आम्हाला शासनाकडून कोणतेही निमंत्रण आलेले नाही. शासनाकडून यावर कोणताही योग्य तो मार्ग काढण्याचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. त्यामुळे परीक्षांसाठी येणारे साहित्य स्वीकारण्यास आम्ही नकार दिला आहे, असे शिक्षण संचालक मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

अपुऱ्या सुविधांमध्ये शिक्षणाची गुणवत्ता घसरल्याचा आरोप

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरती, मोठ्या संख्येने रिक्त असलेल्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या जागा, शासनाकडे रखडलेले शेकडो कोटींचे शिक्षकेतर अनुदान यामुळे शाळा आणि शिक्षण संस्था डबघाईला आल्याचा आरोप शिक्षण संस्थाचालकांकडून करण्यात येत आहे. तसेच अपुऱ्या सुविधांमध्ये शिक्षणाची गुणवत्ता घसरल्याचा आरोप देखील शिक्षण संस्थाचालकांनी केला आहे. राज्य सरकारने त्वरीत याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी शिक्षण संस्थाचालक मंडळाकडून करण्यात आली आहे.

शिक्षण संस्थाचालकांच्या प्रमुख मागण्या

2012 पासून राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी ताबडतोब शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात यावी.

महाराष्ट्रातील सर्व अनुदानित शाळांचे 2004 ते 2013 पर्यंतचे वेतनेत्तर अनुदान थकीत द्यावे.

प्रायव्हेट कंपन्यांना शाळा दत्तक देण्यास संस्थाचालकांनी विरोध दर्शवला आहे

नवीन शैक्षणिक धोरण आणताना आर्थिक तरतुदीबाबत माहिती द्यावी.

दहावी बारावी परीक्षांच्या तारखा

बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 ते 23 मार्च 2024 या कालावधीत होणार आहे, तर दहावीची लेखी परीक्षा 1 मार्च 2024 ते 26 मार्च 2024 या कालवधीत होणार आहे. इयत्ता 10 वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी 2024 ते गुरूवार दिनांक 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत होणार आहे. तसेच इयत्ता 12 वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी 2024 ते मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी 2024 या कालावधीत होणार आहे.