मदरशांमध्ये कुराण सोबत रामायण शिकवणार!

वक्फ बोर्डाचा मोठा निर्णय

डेहराडून – मदरशांमध्ये आता कुराण सोबत रामायण देखिल शिकवले जाणार आहे. वक्फ बोर्डाने हा मोठा निर्णय घेतला आहे. उत्तराखंड वक्फ बोर्डाशी संलग्न असलेल्या मदरशांसाठी यावर्षी सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक सत्रापासून भगवान रामाची कथा नवीन अभ्यासक्रमाचा भाग बनवण्यात येणार आहे. वक्फ बोर्डाच्या अंतर्गत असलेल्या ११७ मदरशांपैकी, डेहराडून, हरिद्वार, नैनिताल आणि उधमसिंहनगर जिल्ह्यातील चार मदरशांमध्ये सुरुवातीला नवीन अभ्यासक्रम सुरु केला जाणार असल्याचे उत्तराखंड वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी सांगितले.

शादाब शम्स यांनी सांगितले की, शिक्षकांची भरती झाल्यानंतर उर्वरित ११३ मदरशांमध्ये ही नियुक्ती केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आम्ही कुराण आणि रामायण शिकवू. आपल्या मोठ्या भावासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या लक्ष्मणाबद्दल आपण आपल्या विद्यार्थ्यांना सांगू शकतो.

तर सिंहासन मिळवण्यासाठी आपल्या भावांची हत्या करणाऱ्या औरंगजेबाबद्दल सांगायची काय गरज आहे? ओळखल्या गेलेल्या या चार मदरशांमध्ये योग्य ड्रेस कोड देखील लागू केला जाईल, असे उत्तराखंड वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी सांगितले.

शम्स यांनी सांगितले की, बोर्ड लवकरच चार मदरशांमध्ये मुख्याध्यापकांची नियुक्ती करणार आहे. या मुख्याध्यापकांना रामायणाचे चांगले ज्ञान असलेल्या शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी अधिकृत केले जाईल जेणेकरून ते विद्यार्थ्यांना चांगले शिकवू शकतील. त्यादृष्टीने आपण पावलं उचलत असल्याचेही त्यांनी सांगितले.

निवडलेल्या चार मदरशांमध्ये स्मार्ट क्लाससह मॉडेल मदरसे म्हणून विकसित केले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या संस्थांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्याची तीव्र गरज आहे आणि आम्ही नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग पुस्तकं सादर करण्याच्या प्रक्रियेत आहोत, असेही त्यांनी सांगितले.