उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नाव चुकल्याने आयुक्तांवर निलंबनाची कारवाई

मुंबई – संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व्यवस्थापनाकडून प्रकाशित करण्यात आलेल्या दिनदर्शिकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावात चूक झाल्याने संबंधित आयुक्तांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षा शीतल कडधेकर यांनी याबाबत ट्विट करताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विषयाची तातडीने दखल घेत संबंधित आयुक्तांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व्यवस्थापनाकडून दरवर्षी जानेवारी महिन्यात वन्य प्राण्यांचे छायाचित्र असलेली दिनदर्शिका प्रकाशित करण्यात येते. यावर्षी व्यवस्थापनाकडून दिनदर्शिकेच्या मुखपृष्ठावर वाघाचे चित्र व वरील बाजूस मुख्यमंत्री,

उपमुख्यमंत्री आणि वन मंत्री यांचे नावासहित फोटो छापण्यात आले. मात्र छापण्यापूर्वी योग्य पडताळणी केली नसल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वडिलांचे नाव चुकीचे छापण्यात आले; तर यामध्ये वन मंत्री यांच्या वडिलांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला नाही.

या दिनदर्शिकेचे शासकीय कार्यालय, तसेच पर्यटकांमध्ये वाटपही करण्यात आले आहे. याबाबत शीतल कडधेकर यांनी या चुकीच्या छपाईबाबत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना ट्विट केले. यावर तातडीने दखल घेण्यात आली.

दरम्यान, सदर चुकीची दुरुस्ती करण्यात येत असून याबाबत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. भविष्यात अशी चूक पुन्हा होणार नाही, याची दक्षता प्रशासनाकडून घेण्यात येईल, असे ट्विट संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाकडून करण्यात आले आहे.