अंगणवाडी सेविकांचा संप मागे; पेन्शन योजना, ग्रॅच्युईटी लागू करण्यावर शिक्कामोर्तब

शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजनेचा अंतिम प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे मान्य केले.

कोल्हापूर – अंगणवाडी सेविकाव मदतनीसांना पेन्शन योजना  व ग्रॅच्युइटी लागू करून त्याची तत्काळ अंमलबजावणी केली जाईल, या निर्णयाची घोषणा महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांनी केल्यानंतर अंगणवाडी सेविका, मदतनीसांनी संप मागे घेतला.

मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. मिनी अंगणवाड्याचे मोठ्या अंगणवाडीत रूपांतर, सेविकांना तत्काळ मोबाईल दिले जाणार असून, मानधनवाढीचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर सादर करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय कृती समितीने  जाहीर केला.

मुंबईतील बैठकीत कोल्हापूरचे आप्पा पाटील, सुवर्णा तळेकर यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी एम. ए. पाटील, शुभा शमीम, दत्ता देशमुख, दिलीप उटणे, माधुरी क्षीरसागर, निशा शिवरकर उपस्थित होते. शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजनेचा अंतिम प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे मान्य केले असून, लवकरात लवकर प्रस्ताव मंत्रिमंडळात मंजुरीसाठी पाठवला जाईल, असे सांगितले. तसेच कृति समितीच्यावतीने पेन्शन योजनेबाबत ठोस सुधारणांचा लेखी प्रस्ताव देण्यात आला.

मान्य मागण्या

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ग्रॅच्युईटी देणार

मोबाईल हॅण्डसेट तत्काळ देणार

मिनी अंगणवाडी सेविकांना पूर्ण अंगणवाडी सेविका

पदाचे आदेश त्वरित देणार

कोरोनाकाळात तसेच उन्हाळी व दिवाळी सुटीमध्ये केलेले काम संपकाळात समायोजित करावे, त्याद्वारे संपकाळातील मानधन अंगणवाडी सेविकांना मिळेल, यावर सकारात्मक विचार

दहावी उत्तीर्ण मदतनीसांना सेविकापदी थेट नियुक्ती देणार

दीड महिना अंगणवाडी सेविकांचे जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू होते. मुंबईतील बैठकीत मागण्‍या झाल्‍या मान्‍य

jalgaonsandesh

jalgaonsandesh