चोपडा रोटरी क्लब तर्फे भव्य कोविड लसीकरण मोहिम संपन्न…नियोजनबद्ध व शांततापूर्ण वातावरणात सातशे लाभार्थ्यांनी घेतला लाभ…

हेमकांत गायकवाड

चोपडा -मानवतावादी व शैक्षणिक प्रकल्पांसह सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी संस्था म्हणून रोटरी क्लब ही संस्था ओळखली जाते. त्याच अनुषंगाने रोटरी क्लब चोपडा विविध समाजोपयोगी उपक्रम यशस्वीरित्या राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून रोटरी क्लब चोपडातर्फे भव्य मोफत लसीकरण मोहीम शहरातील पंकज विद्यालय येथे आयोजित करण्यात आली . सदर लसीकरण मोहिमेत कोविशिल्ड लसींचा पहिला व दुसरा डोसचा लाभ तब्बल सातशे लाभार्थ्यांनी घेतला.

सदर लसीकरण मोहिमेचे उद्घाटन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर व नगरपालिका रुग्णालयाचे मेडिकल ऑफिसर डॉ. चंद्रकांत बारेला यांच्या हस्ते करण्यात आले. सदर उद्घाटन प्रसंगी डॉ. प्रदीप लासुरकर म्हणाले की, संपूर्ण तालुक्यात कोविड – 19 लसीकरण मोहिमेस उत्तमरीत्या प्रतिसाद मिळत आहे . तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र , उपकेंद्र व त्यांच्या कक्षात येणाऱ्या सर्वच गावांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे व लसीकरण मोहिमेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरपालिका रुग्णालयाचे डॉ. चंद्रकांत बारेला म्हणाले की , आतापर्यंत आम्ही भरपूर ठिकाणी लसीकरण मोहीम राबविल्या . प्रत्येक ठिकाणी थोड्याफार प्रमाणात गोंधळ झालाच आहे पण रोटरी क्लब चोपडाने जे नियोजन केले आहे ते खरोखर वाखाणण्याजोगे आहे त्यात प्रथम रजिस्ट्रेशन ,व्हेरिफिकेशन तसेच पहिला डोस व दुसरा डोस साठी स्वतंत्र रांगा, रांगेतील व्यक्तींमधील सामाजिक अंतर, प्रत्येकास 100% मास्क , हजारो लोकांची उपस्थिती तरीही अतिशय नियोजन व शांततापूर्ण वातावरणात कोविड लसीकरण झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले व पुढील लसीकरण मोहीम सुद्धा पंकज विद्यालयात घ्यावे असा त्यांनी मानस व्यक्त केला .
येणाऱ्या लाभार्थ्यांना मदतीसाठी टीम तयार करण्यात आल्या होत्या . आधारकार्डवर बेनिफिशीयरी आयडी , रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर लिहिणे इत्यादी बाबींसाठी रोटरी क्लब तर्फे मदत केली जात होती.
सदर मोहिम यशस्वीतेसाठी रोटरी क्लब चोपडाचे अध्यक्ष रोटे पंकज बोरोले , मानद सचिव रोटे प्रवीण मिस्त्री , प्रोजेक्ट चेअरमन रोटे नितीन अहिरराव, को- प्रोजेक्ट चेअरमन रोटे रुपेश पाटील आरोग्य सहाय्यक जगदीश बाविस्कर यांसह रोटरीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले व सदर कोविड लसीकरण मोहीम १०० % यशस्वी केल्यात्याबद्दल परिसरातील नागरिकांनी व लाभार्थ्यांनी रोटरी क्लब चोपडाचे अभिनंदन व कौतुक केले आहे….