ब्रेकिंग : अखेर डॉ. केतकी  पाटील व डॉ. उल्हासदादा पाटील  भाजपमध्ये दाखल !

जळगाव – गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देत माजी खासदार डॉ. उल्हासदादा पाटील आणि त्यांची कन्या डॉ. केतकीताई पाटील या आज आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात दाखल झाले आहेत.

डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील व देवेंद्र मराठे यांचे कॉंग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आले होते. यानंतर डॉ. उल्हासदादा पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन कॉंग्रेसवर टिकास्त्र सोडले होते. याप्रसंगी त्यांनी स्पष्टपणे आपली कन्या डॉ. केतकी पाटील या भाजपमध्ये प्रवेश करणार असून आपण देखील लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते.

या अनुषंगाने आज मुंबईत प्रवेश सोहळा पार पडला. यात डॉ. उल्हासदादा पाटील, डॉ. केतकीताई पाटील, देवेंद्र मराठे यांच्यासह अन्य मान्यवरांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ना. गिरीश महाजन आदी नेत्यांनी यांचे स्वागत केले. याप्रसंगी आमदार मंगेश चव्हाण, भाजप प्रदेश महामंत्री आमदार मंगेश चव्हाण, भाजप प्रदेश महामंत्री विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, माजी जि.प. उपाध्यक्ष नंदकुमार महाजन यांच्यासह आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

डॉ. उल्हासदादा पाटील हे समर्थकांसह भाजपमध्ये दाखल झाल्यामुळे आधीच कमकुवत असणार्‍या कॉंग्रेस पक्षाला जबर धक्का बसला आहे. तसेच यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद ही अजून वाढणार असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, दुसरीकडे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते संजय गरूड हे देखील भाजपच्या वाटेवर असून ते आज कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मते जाणून घेतल्यानंतर येत्या काही दिवसांमध्ये भाजपमध्ये दाखल होणार असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh