D2H ला मिळणार नवीन पर्याय! ‘डायरेक्ट टू मोबाईल’ प्रसारणाची लवकरच चाचणी… केंद्र सरकारची माहिती

नवी दिल्ली –‘डायरेक्ट-टू-मोबाइल’ प्रसारण लवकरच प्रत्यक्षात येऊ शकते. यामध्ये मोबाइल वापरकर्ते सिम कार्ड किंवा इंटरनेट कनेक्शनशिवाय व्हिडिओ स्ट्रीम करू शकतील.

एका प्रसारण परिषदेला संबोधित करताना माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यांनी ही माहिती दिली आहे.

देशांतर्गत डायरेक्ट-टू-मोबाइल (D2M) तंत्रज्ञानाची लवकरच 19 शहरांमध्ये चाचणी केली जाईल. यासाठी 470-582 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम देण्यासाठी मजूत तयारी करण्यात येईल. 25-30 टक्के व्हिडिओ ट्रॅफिक D2M वर हलवल्याने 5G नेटवर्कवरील गर्दी कमी होईल. यामुळे देशातील डिजिटल परिवर्तनाला गती मिळेल. गेल्या वर्षी, D2M तंत्रज्ञानाची चाचणी करण्यासाठी एक चाचणी प्रकल्प बंगळुरू, ड्यूटी पथ आणि नोएडा येथे चालवण्यात आला.

अपूर्व चंद्रा म्हणाले की, D2M तंत्रज्ञान देशभरातील सुमारे 8-9 कोटी ‘टीव्ही डार्क’ घरांपर्यंत पोहोचण्यास मदत करेल. देशातील 28 कोटी कुटुंबांपैकी केवळ 19 कोटी कुटुंबांकडे टीव्ही सेट आहेत. देशात 80 कोटी स्मार्टफोन आहेत आणि वापरकर्त्यांपर्यंत 69 टक्के माहिती व्हिडीओ स्वरुपात पोहचतो.

व्हिडिओच्या जास्त वापरामुळे, मोबाइल नेटवर्क ब्लॉक होते, ज्यामुळे ते अधूनमधून चालू होते. सांख्य लॅब्स (Saankhya Labs) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) कानपूर यांनी D2M प्रसारण तंत्रज्ञान विकसित केले आहे. हे तंत्रज्ञान व्हिडीओ, ऑडिओ आणि डेटा सिग्नल थेट सुसंगत मोबाइल आणि स्मार्ट उपकरणांवर प्रसारित करण्यासाठी सार्वजनिक प्रसारकाद्वारे नियुक्त केलेल्या स्थलीय दूरसंचार पायाभूत सुविधा आणि स्पेक्ट्रमचा वापर करते, अशी माहिती अपूर्व चंद्रा यांनी दिली आहे.