कन्या जन्मल्यास 2100 रूपये अन् मुलींना मिळणार ‘माहेरची पैठणी’ ; नंदगावात ग्रा. प्र. सदस्याचा अनोखा उपक्रम

जळगाव – गावातील महिला, माता भगिनींना प्रोत्साहन मिळावे म्हणून गावातील मुलीचे लग्न असल्यास तीला ‘माहेरची साडी’ भेट देण्यात येईल.तर गावातील सुनेला कन्यारत्न प्राप्त झाल्यास नंदलक्ष्मी सुकन्या योजनेत’ २१०० रुपये भेट देण्यात येईल.

नंदगाव येथील युवा ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील सोनवणे यांनी स्वखर्चाने हा उपक्रम सुरु केला आहे.

नंदगावातील लाडकी मुलगी लग्न करून सासरी जातांना माहेरची भेट म्हणून ‘माहेरची साडी’ योजनेंतर्गत स्वप्नील सोनवणे यांच्याकडून स्वखर्चाने पैठणी साडी भेट देणार आहे.

यासाठी लाभार्थी मुलगी गावातील रहिवासी असली पाहिजे व लग्न होण्याच्या दहा दिवस अगोदर परिवाराने ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक अथवा सोनवणे यांच्याकडे लग्नपत्रिका देऊन लग्नाची माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

गावात मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी ‘नंदलक्ष्मी सुकन्या योजना’ या योजनेंतर्गत गावातील सुनबाईने कन्येला जन्म दिल्यास सदस्याकडून एकवीसशे रुपये प्रोत्साहन पर रक्कम भेट दिली जाणार आहे. यासाठी ग्रामपंचायतीकडे कन्येच्या जन्माबाबतची माहिती परिवारामार्फत द्यावी लागणार आहे. हा उपक्रम एक जानेवारी २०२४ पासून सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

“सध्याच्या जगात संपूर्ण समाजाचा महिला आणि मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची नितांत गरज आहे. या योजनेच्या माध्यमातून समाजात मुलींबाबत निर्माण झालेल्या नकारात्मक विचारसरणीत बदल होणार असून गावात भ्रूणहत्येसारख्या गुन्ह्यांनाही आळा बसणार आहे.” स्वप्नील सोनवणे ,ग्रामपंचायत सदस्य ,नंदगाव (ता.जळगाव)

jalgaonsandesh

jalgaonsandesh