तीन समन्स, तरीही केजरीवाल ईडी चौकशीसाठी गैरहजर; आज अटक होणार?

नवी दिल्ली – दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं बजावलेल्या तिसऱ्या समन्सनंतरही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हजर झाले नाहीत. त्यांनी त्यांचं लेखी उत्तर ईडीला पाठवलंय. तसेच, तपास यंत्रणेची नोटीस बेकायदेशीर असल्याचं आम आदमी पक्षाचं म्हणणं आहे. दरम्यान, ईडी आज अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर छापा टाकून त्यांना अटकही करू शकते, असा दावाही काही आप नेत्यांनी केला आहे. ईडी आज अरविंद केजरीवाल यांच्या घरावर छापा टाकू शकते. त्यानंतर त्याला अटकही होऊ शकते, असं दिल्ली सरकारचे मंत्री आतिशी, सौरभ भारद्वाज आणि राज्यसभा खासदार संदीप पाठक यांनी सोशल मीडियावर दावा केला आहे.

ईडीनं वारंवार समन्स बजावूनही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्ली दारू घोटाळ्या प्रकरणी चौकशीसाठी हजर झाले नाहीत. ईडीनं बुधवारी तिसऱ्यांदा पाठवण्यात आलेल्या समन्सवरही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हजर झाले नाहीत. अशा परिस्थितीत ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास यंत्रणा त्यांना पुन्हा समन्स पाठवण्याचा विचार करत आहेत. तपास यंत्रणा येत्या काही दिवसांत मुख्यमंत्र्यांनाही ताब्यात घेऊन चौकशी करू शकते, असं ईडीच्या सूत्रांनी सांगितलं आहे.

केजरीवालांचं ईडीला पत्र 

मुख्यमंत्री आज ईडीसमोर हजर झाले नाहीत, पण त्यांचे पत्र ईडीकडे पोहोचलं आहे. ज्यात केजरीवालांनी असं नमूद केलं आहे की, आज आणि त्यापूर्वी 2 नोव्हेंबर आणि 21 डिसेंबर रोजी पाठवलेलं समन्स हे त्रासदायक विचारांनी प्रेरित होतं. तपासात यंत्रणेला सहकार्य करण्यास तयार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते प्रत्येक प्रश्नाचं उत्तरही देतील, पण यादरम्यान ते राज्यसभा निवडणूक आणि प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये खूप व्यस्त आहेत, त्यामुळे चौकशीसाठी हजर राहू शकत नाही, असं त्यांनी म्हटलं. तसेच, त्यांनी प्रचार करू नये म्हणून त्यांना त्रास दिला जात असल्याचंही केजरीवालांनी पत्रात लिहिलं आहे.

केजरीवालांनी म्हटलं आहे की, ईडीला त्यांना अटक करायची आहे. यापूर्वीही अरविंद केजरीवालांनी तपास अधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलं होतं, ज्यामध्ये म्हटलं होतं की, चौकशीसाठी त्यांना पाठवलेली नोटीस बेकायदेशीर असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे ही नोटीस परत घ्यावी, असंही केजरीवाल म्हणाले होते. निवडणुकीपूर्वी त्यांना नोटीस दिली जाणं, हे राजकीय षडयंत्र आहे, असंही केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

प्रकरण नेमकं काय? 

दिल्लीतील दारू धोरणातील कथित भ्रष्टाचाराची सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय स्वतंत्रपणे तपास करत आहेत. या प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते संजय सिंह आधीच तुरुंगात आहेत. आता ईडी मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित प्रकरणात दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची चौकशी करू इच्छित आहे. सध्याच्या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांनाही अटक होण्याची शक्यता आहे.