सावित्रीबाई फुले यांचे नायगावमध्ये भव्य स्मारक उभारणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

खंडाळा – ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी तत्कालीन परिस्थितीत समाजसुधारणेचं काम केलं. स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मनामध्ये स्वाभिमान जागृृत केला. हे राज्य आणि देश पुरोगामी विचारांवर नेण्यासाठी त्यांचे कार्य अनमोल आहे.

समाजकार्याचं डोंगराएवढे कार्य त्यांनी उभारलं. त्यामुळे डोंगराएवढे उपकार त्यांचे आपल्यावर आहेत. त्यांच्या कार्याची महती देशाला कळावी, यासाठी त्यांचे जन्मस्थळ असलेल्या नायगाव येथे शासनाच्यावतीने दहा एकर जागा अधिग्रहित करून भव्य स्मारक उभारले जाईल आणि त्यासाठी १०० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाईल,’ अशी घोषणा मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी केली.

नायगाव, ता. खंडाळा येथे बुधवारी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास अभिवादन केल्यानंतर जयंती समारंभात ते बोलत होते. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, गृहनिर्माण व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार मकरंद पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे, आमदार महादेव जानकर, आमदार नरेंद्र पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलिस अधीक्षक समीर शेख, शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यासह विविध पक्षांचे प्रमुख पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जिल्हा परिषदेने घेतलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण तसेच राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर इतर मागासवर्ग महामंडळाच्या महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजनेच्या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले.

jalgaonsandesh

jalgaonsandesh