14 जानेवारीपासून राहुल गांधी यांची ‘भारत न्याय यात्रा’, मणिपूर ते मुंबई 6200 किमी प्रवास

लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेस नेते राहुल गांधी ‘भारत न्याय यात्रा’ काढून देशात जागर करणार आहेत. 14 जानेवारी रोजी मणिपूरमधून या यात्रेची सुरुवात होणार असून तब्बल 6 हजार 200 किलोमीटरचे अंतर या यात्रेत कापले जाणार आहे.

14 राज्ये आणि 85 जिल्ह्यांची पदयात्रा करून ही न्याययात्रा महाराष्ट्रात दाखल होणार असून 20 मार्च रोजी मुंबईत या यात्रेची सांगता होणार आहे. अनेक अर्थांनी ही यात्रा अभूतपूर्व आणि ऐतिहासिक ठरणार आहे.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते कश्मीर अशी भारत जोडो यात्रा 7 सप्टेंबर 2022 ते 20 जानेवारी 2023 या कालावधीत काढली होती. 4080 किलोमीटर अंतर या यात्रेत त्यांनी कापले होते. भारत जोडोपेक्षा 2 हजार किमी जास्त पायी अंतर राहुल गांधी भारत न्याय यात्रेत कापणार आहेत.

– ईशान्य हिंदुस्थान ते पश्चिम हिंदुस्थान अशी ही यात्रा असेल. 14 जानेवारीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या यात्रेला मणिपूरची राजधानी इम्फाळ येथे हिरवा झेंडा दाखवतील.

– मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र अशा एकूण 14 राज्यांतील 85 जिह्यांमधून यात्रेचा मार्ग जाणार आहे.

– भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी आर्थिक विषमता, जातीय व धार्मिक ध्रुवीकरण आणि हुकूमशाही प्रवृत्तीविरोधात आवाज उठवला होता. न्याय यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी देशातील जनतेसाठी न्यायाची मागणी करतील, असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्यायासाठी… लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी ही यात्रा असेल. महागाई, बेरोजगारीने देशातील कोटय़वधी जनता त्रस्त आहे. त्यांना न्याय देण्यासाठी या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी ही यात्रा आहे, असेही रमेश यांनी नमूद केले. या यात्रेदरम्यान राहुल गांधी पदयात्रा आणि बसनेही प्रवास करतील. तरुण, महिला आणि उपेक्षितांशी ते संवाद साधतील, असेही त्यांनी नमूद केले.

लोकसभा निवडणुका एप्रिल किंवा मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीआधी इंडिया आघाडीची भक्कम मोट बांधली गेली असतानाच राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेने देशभरातील वातावरण ढवळून निघणार आहे. मोदी सरकारविरोधी आवाजाला या यात्रेने धार येणार आहे. त्यामुळे भाजपचे धाबे दणाणले आहे.

इंडिया आघाडीतील अन्य पक्षांच्या यात्रेतील सहभागाविषयीचा तपशील ठरवण्यात येत आहे, असे वेणुगोपाल यांनी सांगितले. मणिपूर हा देशाचा महत्त्वाचा भाग आहे आणि वांशिक हिंसाचारात होरपळलेल्या या राज्यातील जनतेच्या जखमांवर फुंकर घालण्याची प्रक्रिया काँग्रेसला सुरू करायची असल्यामुळे मणिपूरची यात्रेचे आरंभस्थळ म्हणून निवड करण्यात आली, असे वेणुगोपाल म्हणाले.

jalgaonsandesh

jalgaonsandesh