जळगाव शहरात पहिले केंद्र ; कापूस महामंडळातर्फे हमीभावात खरेदीचा प्रारंभ … 

जळगाव – भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय)तर्फे जळगाव जिल्ह्यात कापूस खरेदीस प्रारंभ झाला आहे.

पहिले केंद्र शिवाजीनगरातील महावीर जिनिंगमध्ये सुरू करण्यात आले असून, सात हजार वीस रुपये प्रतिक्विंटल हमीभाव देण्यात आला आहे.

कापूस मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. आतापर्यंत केवळ खासगी व्यापाऱ्यांकडूनच खरेदी करण्यात येती होती. भारतीय कापूस महामंडळातर्फे खरेदी सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. मात्र कापसाला हमीभावही चांगला देण्याची मागणी करण्यात आली होती.

कापूस महामंडळातर्फे जळगाव जिल्ह्यात खरेदी सुरू करण्यात आली आहे. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रांतर्गत खरेदी सुरू करण्यात आली आहे. शिवाजीनगरातील महावीर जिनिंग ॲन्ड प्रेसिंग येथे बुधवारी (ता. २०) पहिले केंद्र म्हणून प्रारंभ करण्यात आला आहे.

या वेळी बाजार समितीचे सभापती श्यामकांत सोनवणे, तसेच संचालक सुनील महाजन, दिलीप कोळी, संदीप पाटील, हर्षल नारखेडे व सी.सी.आय.चे केंद्रप्रमुख मिणा व बाजार समितीचे सचिव प्रमोद काळे, सुपरव्हायझर विकास सूर्यवंशी उपस्थित होते.

सात हजार वीस रुपये हमीभाव

कापूस खरेदीच्या प्रारंभालाच शेतकऱ्यांना सात हजार वीस रुपये हमीभाव देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी कापूस आणताना या वर्षी पेरा केलेला सातबाराचा उतारा, आधारकार्डची अपडेट छायाकिंत प्रत व राष्ट्रीयीकृत बँक पासबुकाची झेरॉक्स प्रत सोबत आणावी, तसेच आपला कापूस सुकवून व स्वच्छ करून कापूस खरेदी केंद्रावर आणावा, असे आवाहनही बाजार समितीच्या सभापतींनी केले आहे.

प्रतिसाद मिळाल्यास केंद्र वाढविणार

जळगाव जिल्ह्यात पहिले केंद्र सुरू होत आहे. शेतकऱ्यांनी कापूस खरेदी केंद्रास चांगला प्रतिसाद दिला व खरेदी केंद्रांची मागणी आल्यास, आणखी खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे बाजार समितीतर्फे सांगण्यात आले.

jalgaonsandesh

jalgaonsandesh