ठरलं! आता रोहित शर्मा नाही तर ‘हा’ असणार मुंबई इंडियन्सचा कर्णधार

मुंबई – क्रिकेट विश्वचषकानंतरआता सर्वत्र आयपीएलची (IPL) उत्सुकता आहे. विश्वचषकात भारताचं नेतृत्व करणार्‍या रोहित शर्माचं ट्रॉफी उंचावण्याचं स्वप्न तुटल्यामुळे चाहते त्याला आयपीएलमध्ये पाहण्यासाठी उत्सुक होते. पण आता रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून दिसणार नाही. त्याच्याऐवजी हार्दिक पांड्याची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. दुखापतीमुळे हार्दिकला विश्वचषक अर्ध्यातून सोडावा लागला होता पण आता तो आयपीएल गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे.

रोहित शर्माने २०१३ पासून मुंबईच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. त्याच्या नेतृत्वात मुंबईने पाच वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं होतं. पण, यापुढे मुंबईचा संघ हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. सुरुवातीला गुजरात टायटन्समध्ये असलेल्या पांड्याला १५ कोटी रुपयांमध्ये २०१५ मध्ये मुंबईने गुजरात संघाकडून ट्रेड केले होते. त्यानंतर हार्दिक पांड्या कर्णधार होणार अशी चर्चा होती. आता यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

मुंबई इंडियन्सचे ग्लोबल हेड ऑफ फरफॉर्मन्स प्रमुख माहेला जयवर्धने म्हणाले, ”मुंबई इंडियन्ससाठी भविष्याच्या तयारीच्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. सचिन तेंडुलकर ते हरभजन सिंग आणि रिकी पाँटिंग ते रोहित शर्मा यासारख्या दिग्गजांचे मुंबई इंडियन्सला नेतृत्व लाभले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने यशाची शिखरं पादाक्रांत केली आहेत. आता भविष्याचा विचार करताना निर्णय घ्यावे लागत आहेत. त्यामुळे हार्दिक पांड्याची कर्णधार म्हणून नियुक्ती केली गेली आहे”.

पुढे ते म्हणाले, “रोहित शर्माच्या नेतृत्वाबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. २०१३ पासूनचा मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून त्याचा कार्यकाळ अविश्वसनीय होता. त्याच्या नेतृत्वाने संघाला अतुलनीय यशच मिळवून दिले नाही तर आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक म्हणून त्याचे स्थान पक्के केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स सर्वात यशस्वी संघ बनला. त्याचा अनुभव व मार्गदर्शन यापुढेही संघाला मजबूत करण्यासाठी मिळत राहणार आहे”, असं जयवर्धने म्हणाले.

jalgaonsandesh

jalgaonsandesh