‘कॉलेज आवारात पंतप्रधानांच्या प्रतिमेसह सेल्फी पॉइंट उभारा!’

विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीचे विद्यापीठे, कॉलेजांना निर्देश

तरुणांमध्ये भारताच्या विविध क्षेत्रांतील कामगिरीबद्दल जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने देशभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांना त्यांच्या कॅम्पसमधील मोक्याच्या ठिकाणी ‘सेल्फी पॉइंट्स’ स्थापन करण्यास सांगितले आहे.

शिक्षण मंत्रालयाने सादर केलेल्या थ्रीडी लेआउट्समधील मंजूर डिझाइननुसार हे सेल्फी पॉइंट तयार केले जातील.

विद्यापीठ अनुदान आयोगाने सेल्फी पॉइंटचे नमुने शेअर केले आहेत, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असून त्यात सरकारने शिक्षण आणि नावीन्यता क्षेत्रांमध्ये भारताने केलेल्या कामगिऱ्यांची क्षणचित्रेही आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने जाहीर केलेल्या पत्रकानुसार, शैक्षणिक संस्थांना ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ यांसारख्या राष्ट्रीय उपक्रमांच्या विस्तृत परिप्रेक्ष्यात आणि नवीन शैक्षणिक धोरण,२०२० च्या प्रमुख क्षेत्रांचा समावेश असलेल्या संकल्पनेवर सेल्फी पॉइंट उभारण्यास सांगितले आहे.

त्यानुसार यूजीसीचे अध्यक्ष एम जगदेश कुमार यांनी, अंतराळ संशोधन, क्रीडा, पायाभूत सुविधांचा विकास, महिलांच्या नेतृत्वाखालील विकास, शाश्वत ग्रामीण विकास, माहिती तंत्रज्ञान, डिजिटल कनेक्टिव्हिटी, यांसारख्या क्षेत्रात भारताच्या उत्कृष्ट कामगिरीबाबत तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या सेल्फी पॉइंट्सद्वारे बरेच काही प्रदर्शित केले जाऊ शकते, असे ते पुढे म्हणाले.

यूजीसीचे सचिव मनीष रत्नाकर जोशी म्हणाले की, आयोगाने सेल्फी पॉईंटचे नमुने शेअर केले आहेत ज्यात भारताच्या कामगिरीच्या स्नॅपशॉटसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh