रायपूर स्टेडियमची बत्ती गुल! भारत – ऑस्ट्रेलिया चौथा सामना होण्याऱ्या स्टेडियमचा वीजपुरवठा आहे बंद

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा आणि महत्वाचा सामना आज (दि. 01) रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह स्टेडियमवर होणार आहे. मालिका विजयासाठी हा सामना भारताच्या दृष्टीने महत्वाचा असून ऑस्ट्रेलिया देखील मालिका 2 – 2 अशी बरोबरीत आणण्यासाठी या सामन्यात आपलं सर्वस्व पणाला लावणार आहे.

मात्र याच रायपूर स्टेडियमला वीजपुरवठाच होत नाहीये. एबीपी अनकटने दावा केल्याप्रमाणे या स्टेडियमचे 2009 पासूनचे विजेचे तब्बल 3.16 कोटी रूपये बील थकित आहे. त्यामुळे त्याचा वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे.

रायपूर स्टेडियम प्रशासनाने जवळपास 3.16 कोटी रूपयाचं वीज बील भरलेलं नाही. त्यामुळे त्यांचा वीजपुरवठा पाच वर्षापूर्वीच कापण्यात आला आहे. मात्र छत्तीसगड क्रिकेट असोसिएशनच्या विनंतीनंतर तात्पुरता वीज पुरवठा करण्यात येत आहे. मात्र वीज पुरवठा फक्त प्रेक्षक गॅलरी आणि बॉक्सला देण्यात आला आहे. आजच्या सामन्यासाठीच्या फ्लड लाईट्सला जनरेटरद्वारे वीज पुरवठा होणार आहे.

रायपूर ग्रामीण विभागाचे प्रमुख अशोक खंडेलवाल यांनी क्रिकेट असोसिएशनच्या सचिवांनी तात्पुरत्या वीज पुरवठ्याची क्षमता वाढवण्याची विनंती केली आहे.

सध्याच्या घडीला तात्पुरत्या वीज पुरवठ्याची क्षमता ही 200 किलोवॅट इतकी आहे. त्यांनी अर्ज करून ही क्षमता 1 हजार किलोवॅट करण्याची मागणी केली आहे. त्यांची ही मागणी मान्य केली आहे मात्र त्याबाबतचे काम अजून सुरू झालेलं नाही.

रायपूर स्टेडियमचा वीज पुरवठा बंद केला असल्याची बाब 2018 मध्ये उघड झाली होती. त्यावेळी हाफ मॅरॅथॉनमधील सहभागी खेळाडूंना स्टेडियमला वीज पुरवठा होत नाहीये याची माहिती मिळाली होती. त्यावेळी 2009 पासून स्टेडियमने 3.16 कोटी रूपयांच वीज बिल हे भरण्यात आलेलं नाही हे समोर आलं.

jalgaonsandesh

jalgaonsandesh