जळगाव जिल्‍हा अपघाती मृत्यूसाठी ‘टॉप 5’मध्ये : डॉ. रवींद्रकुमार सिंघल

जळगाव – राज्यात रस्ते अपघातातील वर्षभरात मृतांची संख्या वाढत आहे. सर्वाधिक अपघाती मृत्यू होणाऱ्या राज्यातील पाच जिल्ह्यात जळगाव जिल्ह्याचा समावेश आहे. गेल्यावर्षभरात साडेपाचशेहून अधिक वाहनधारकांना जीव गमवावा लागला.

त्यावर उपाय म्हणून महामार्गावरील अपघातातील जखमींचे प्राण वाचवण्यासाठी पोलीस दलातर्फे मृत्युंजय दूताची फौज उभी करण्यात येत आहे.

जीव वाचवणाऱ्या अशा दूतांना १ लाखांपासून ५ लाखांपर्यंतचे बक्षीस देऊन गौरवण्यात येईल, अशी माहिती राज्याचे वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी गुरुवारी (ता. ३०) येथे दिली.

राष्ट्रीय महामार्गावर पाळधी (ता.धरणगाव) येथे महामार्ग पोलीस दलाच्या पोलीस मदत केंद्राचे उदघाटन डॉ. सिंघल यांच्या हस्ते करण्यात आले. महामार्ग विस्तारीकरणानंतर ही पोलीस चौकी तोडण्यात आली होती. नव्याने चौकीची उभारणी करण्यात आली असून पोलीस केंद्राच्या उदघाटनासाठी डॉ. सिंघल जळगावमध्ये आले होते. त्यांच्या हस्ते जिल्‍ह्यातील अपघातात जखमींचे प्राण वाचवणाऱ्या मृत्युंजय दूतांचा सत्कार करण्यात आला.

महामार्ग पोलीस ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार, उद्योजक श्रीकांत मणियार, पोलीस उपअधीक्षक प्रदीप मैराळे (नाशिक), पोलीस निरीक्षक हेमंत भामरे (धुळे), प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल शेजवळ आदी उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर श्री. सिंघल यांनी विविध संघटनांसह पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत अपघाती मृत्यूबाबत मदत करण्यासाठी आवाहन केले. पत्रकारांशी बोलताना श्री. सिंघल म्हणाले यांनी अपघातात जखमींचे प्राण वाचवण्यासाठी नागरिकांनी अधिक सहभाग नोंदवण्यातून मृत्यूंची संख्या नियंत्रणात येण्यास मदत होईल, असे स्पष्ट केले.

अधिक मृत्यूंचे जिल्हे

राज्यात सर्वाधिक अपघात मुंबईत होत असले तरी, तेथे मृत्यूचे प्रमाण सरासरी आहे. मात्र पुणे (ग्रामीण), नगर, सोलापूर, नाशिक आणि जळगावमध्ये अपघाती मृत्यूंची संख्येत वाढ झाली. अपघात नियंत्रणात आणण्याचे काम यंत्रणेद्वारे करण्यात येत असून अपघाती मृत्यू नियंत्रणात आणण्यासाठी सर्वसामान्य नागरिक, वाहनधारक, ग्रामस्थांच्या मदतीची अपेक्षा आहे.

वेळीच अपघातातील जखमींना मदत मिळाल्याने त्यांचे प्राण वाचवले जाऊ शकतात. अपघातात मदत करणाऱ्यांना पोलिसांचा कुठलाही त्रास होणार नाही अथवा चौकशी होत नाही, असेही श्री. सिंघल यांनी सांगितले.

यमदूत विरुद्ध मृत्युदूत

गेल्या वषर्भरात साडेसात हजारांवर वाहनधारकांचा अपघातात मृत्यू आला. श्री. सिंघल म्हणाले, की राज्यात २०२१ मध्ये मृत्युंजय दूत यांचे संघटन तयार करण्यास सुरुवात झाली. राज्यात ३ हजार ६०० मृत्युंजय दूत असून त्यांना अपघाताबाबत महामार्ग पोलीस विभागातर्फे मार्गदर्शन करण्यात येते. त्यासाठी त्यांना स्ट्रेचर, प्रथमोपचार कीटचे वाटपही करण्यात येते. त्यांना रस्ते सुरक्षेबाबत प्रोत्साहन मिळावे म्हणून बक्षीस योजना राबवली जाते.

jalgaonsandesh

jalgaonsandesh