महाराष्ट्रातील 232 मंदिरांमध्ये प्रवेशासाठी ड्रेस कोड नियम लागू; कोकणातील प्रसिद्ध 47 मंदिरांचा समावेश

राज्य शासनाने वर्ष २०२० मध्ये राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात वस्त्रसंहिता लागू केली आहे.

इतकेच नव्हे तर देशातील अनेक मंदिरे, गुरूद्वारा, चर्च, मशिदी आणि अन्य प्रार्थनास्थळे, खासगी अस्थापने, शाळा, महाविद्यालय, न्यायालय, पोलिस आदी सर्वच क्षेत्रांत वस्त्रसंहिता लागू आहे. त्याच धर्तीवर मंदिरांचे पावित्र्य, शिष्टाचार, संस्कृती जपण्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघातर्फे जिल्ह्यात ११ ठिकाणी बैठका घेण्यात आल्या.

या बैठकांमध्ये जिल्ह्यातील ४७ मंदिरांच्या विश्वस्तांनी त्या मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीनुरूप वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली

मंदिराचे पावित्र्यरक्षण आणि भारतीय संस्कृती यांचे पालन व्हावे, या उद्देशाने मंदिरामध्ये भाविकांनी येतांना अंगप्रदर्शन करणारे उत्तेजक तथा तोकडे कपडे घालून येऊ नयेत तसेच भारतीय संस्कृतीचे पालन करून मंदिर प्रशासनात सहकार्य करावे, असे आवाहनही घनवट यांनी केले.

तसे फलक जिल्ह्यातील २० मंदिरांच्या दर्शनी भागात लावले आहेत. कशेळी (ता. राजापूर) येथील श्री कनकादित्य मंदिर, आडिवरे येथील महाकाली मंदिर, श्री विठ्ठल राम पंचायतन मंदिर, स्वयंभू श्री काशी विश्वेश्वर देवस्थान, नाचणे येथील ग्रामदैवत श्री नवलाई देवी मंदिर, पावस येथील श्रीराम मंदिर, चिपळूणचे प्रसिद्ध ग्रामदैवत श्री जुना कालभैरव मंदिर, विंध्यवासिनी मंदिर.

तसेच रामवरदायिनी मंदिर आदींसह जिल्ह्यातील ४७ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी जळगाव येथे फेब्रुवारी २०२३ मध्ये मंदिरे अन् धर्मपरंपरा यांच्या रक्षणार्थ झालेल्या राज्यस्तरीय महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेत हा ठराव संमत केला होता. त्याची कार्यवाही राज्यातील मंदिरांमध्ये केली आहे.

संस्कृतीच्या प्रसार, प्रचाराला बळ

भारतीय वस्त्र घातल्याने आपल्या संस्कृतीचा प्रचार प्रचार होण्यासह तिच्याविषयी युवापिढीमध्ये स्वाभिमानही जागृत होईल तसेच पाश्चात्त्यांच्या तुलनेत पारंपरिक वस्त्रनिर्मिती करणाऱ्या उद्योगाला चालना मिळेल. ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल. मंदिरातील सात्त्विकता अधिक प्रमाणात ग्रहण करायची असेल तर आपले आचरण आणि वेशभूषा सात्त्विक असायला हवी, असेही घनवट यांनी सांगितले.

jalgaonsandesh

jalgaonsandesh