तसं आपण प्रत्येक जण गरजेच्या वस्तू खरेदी करतं. पण काही लोकांना शॉपिंगची इतकी हौस असते की ते लोक खूप शॉपिंग करतात. काहीही खरेदी केल्यानंतर तुम्हाला दुकानदार बिलही देतो.
तसं हे बिल आपण काही कालावधीपर्यंत स्वतःकडे सांभाळून ठेवतो पण नंतर फेकून देतो. पण यापुढे हे बिल फेकण्याची चूक बिलकुल करू नका. कारण हे बिल तुम्हाला करोडपती बनवू शकतं.
शॉपिंग केल्यानंतर तुम्हाला मिळालेल्या बिलावर सरकार तुम्हाला पैसे देणार आहे. थोडेथोडके नव्हे तर तब्बल एक कोटी रुपये. सरकारने अशी योजना सुरू केली आहे. ज्यात तुम्ही शॉपिंग बिल दाखवल्यावर तुम्हाला 10,000 रुपयांपासून ते 1,00,00,000 रुपयांपर्यंतची बक्षिसे मिळू शकतात. आता ते कसं आणि याची संपूर्ण प्रक्रिया काय आहे, ते समजून घेऊया. यासंबंधीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
अमित सिंग नावाच्या व्यक्तीने इंस्टाग्रामवर hellomonktv नावाचा एक व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडीओतील माहितीच्या आधारे, जर तुम्ही कुठेतरी खरेदी करत असाल किंवा महागड्या ठिकाणी खाद्यपदार्थ खात असाल तर तुमचे GST इनव्हॉइस बिल मागवा आणि ते तुमच्याकडे ठेवा. ‘My Bill, My Rights APP’ वर जाऊन ते बिल अपलोड करा. हे केल्यानंतर तुम्हाला 10 हजार रुपयांपासून ते 1 कोटी रुपयांपर्यंतचे रिवॉर्ड मिळू शकतात. न्यूज18मराठी या बातमीच्या सत्यतेची पुष्टी करत नाही.
हे अॅप iOS आणि Android मोबाईलवर तसेच ‘web.merabill.gst.gov.in’ या वेब पोर्टलवर उपलब्ध आहे. अपलोड केलेल्या प्रत्येक इनव्हॉइससाठी रिसिव्हिंग की नंबर (ARN) जारी केला जाईल. या आधारे बक्षीस सोडत काढण्यात येणार आहे. विजेत्याची घोषणा महिन्यातून किंवा 3 महिन्यांनी नियमित अंतराने केली जाईल. विजेत्यांना एसएमएस, मोबाइल अॅप आणि पोर्टलद्वारे सूचित केलं जाईल. यामध्ये लोक 10,000 ते 1 कोटी रुपयांपर्यंतची रक्कम जिंकू शकतात. यामध्ये सहभागी होण्यासाठी तुमच्या बिलाची रक्कम किमान 200 रुपये असावी.
ही योजना आणण्यामागे सरकारचा उद्देश ग्राहकांना त्यांच्या कोणत्याही खरेदीसाठी बिल घेण्यास प्रोत्साहित करणं हा आहे. यासाठी, भारत सरकारने देशातील सर्व राज्य सरकारांच्या सहकार्याने “चलान प्रोत्साहन योजना” सुरू केली आहे. ही योजना 1 सप्टेंबर 2023 रोजी सुरू करण्यात आली आहे. भारत सरकारचा हा उपक्रम राज्यांमधील GST-नोंदणीकृत दुकानदारांनी ग्राहकांना दिलेल्या सर्व व्यवसाय-ते-ग्राहक पावत्यांवर लागू होईल.
सध्या, आसाम, गुजरात आणि हरियाणा ही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी, दादरा नगर हवेली आणि दमण आणि दीव या पथदर्शी प्रकल्पात सहभागी होत आहेत. येत्या काही महिन्यांत आणखी राज्ये जोडली जाण्याची शक्यता आहे.