कुत्रा चावल्यास सरकारला दंड, 20 हजार रुपये भरपाई द्यावी लागणार; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

कुत्रा चावण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पंजाब आणि हरियाणाच्या उच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. रस्त्यांवरील भटक्या कुत्र्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे जर या कुत्र्यांनी कोणत्या व्यक्तीला चावले तर त्याची नुकसान भरपाई दोन्ही राज्य सरकारांना द्यावी लागणार आहे. कोर्टाने पीडित व्यक्तीला 10,000 रुपये प्रति दात अशी भरपाई देण्याचे आदेश दिले. यासोबतच न्यायालयाने राज्य सरकारला याबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे आदेशही दिले आहेत.

न्यायमूर्ती विनोद एस भारद्वाज यांच्या खंडपीठाने चंदीगडमध्ये कुत्रा चावण्याच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली. एस भारद्वाज यांच्या खंडपीठाने १९३ याचिकेवर तोडगा काढताना हा निर्णय दिला. कुत्रा चावल्यामुळे दातांच्या खुणा दिसल्यास पीडितेला प्रति दाताच्या खूणाप्रमाणे १० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, असे खंडपीठाने म्हटले आहे. याशिवाय कुत्रा चावल्यामुळे त्वचेवर जखम झाली असेल किंवा कुत्र्याने मांस काढले असेल तर प्रत्येकी 0.2 सेमी जखमेसाठी किमान 20,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी.

न्यायालयाने सरकारला दिले मार्गदर्शन तत्वे तयार करण्याचे आदेश-

नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी दोन्ही राज्य सरकारांची असेल, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती विनोद एस भारद्वाज यांच्या खंडपीठाने सांगितले की, कुत्र्याशी संबंध असलेल्या कोणत्याही व्यक्ती किंवा एजन्सीकडून राज्य सरकार नुकसानभरपाईची रक्कम वसूल करू शकते. कुत्रा चावण्याच्या घटनांमुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. यावर नियंत्रण न आल्यास प्रकरणे आणखी वाढतील. त्यामुळे आता राज्य सरकारने याची जबाबदारी घ्यावी. त्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे आदेशही न्यायालयाने सरकारला दिले आहेत.