बाळाचा अर्धवट शरीर असलेला मृतदेह आढळल्याने खळबळ

जळगाव – यावल तालुक्यातील सातोद गाव शिवारात प्राण्यांनी खाल्लेला नऊ महिन्यांच्या बाळाचा अर्धवट मृतदेह मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. यावल पोलिसांनी तत्काळ गावात जावून त्या बाळाचा अर्धवट अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयात ठेवला असून याप्रकरणी यावल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील सातोद येथील इंदिरानगर परिसरात मंगळवार (दि. ७) सकाळच्या सुमारास ग्रामपंचायतचे सफाई कर्मचारी यांना या ठिकाणी पूर्ण नऊ महिन्याचे प्राण्यांनी अर्धे शरीर खाल्लेले बाळ मिळून आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतावस्थेत असलेल्या अर्ध शरीराच्या बाळाला ताब्यात घेत यावलच्या ग्रामीण रुग्णालयात आणले आहे. हे बाळ हे कुणाच्या तरी अनैतिक संबंधातून जन्मास आले असावे, समाजात बदनामी होईल या भितीपोटी या बाळास अशा प्रकारे जन्म दिल्यावर बेवारस सोडून दिले असावा असा अंदाज लावला जात आहे. यावल पोलीस ठाण्यात या घटनेशी संबधित बाळाच्या मृत्यून कारणीभुत अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे, तपास करीत आहे.