मोबाईल यूजर्सना मिळणार ‘युनिक आयडी’, मोदी सरकारचा नवा प्लॅन; काय होणार फायदा?

देशातील मोबाईल यूजर्सना भारत सरकार लवकरच एक युनिक आयडी देणार आहे. हा ID नंबर म्हणजे तुमचं मोबाईल आणि सिम कार्ड वापरण्याचं ओळखपत्र असेल. यामध्ये एखाद्या व्यक्तीकडे किती फोन आहेत, किती सिम कार्ड आहेत, कोणतं सिम कुठे अ‍ॅक्टिव्ह आहे अशी सर्व माहिती सेव्ह असणार आहे.

दि फायनॅन्शिअल एक्स्प्रेसने याबाबत माहिती दिली आहे. केंद्र सरकारच्या आयुषमान भारत योजनेमध्ये ज्याप्रमाणे नागरिकांना एक 14 अंकी युनिक आयडी मिळतो; त्याचप्रमाणे हा नंबर असणार आहे. ABHA नंबरने ज्याप्रमाणे नागरिकांची हेल्थ हिस्ट्री एका ठिकाणी सेव्ह राहते, त्याचप्रमाणे मोबाईल आणि सिमकार्डची माहिती देखील युनिक आयडीमुळे एका ठिकाणी सेव्ह राहणार आहे.

कशामुळे घेतला निर्णय?

सध्या वाढत चाललेल्या सायबर आणि मोबाईल फ्रॉडमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. सोबतच मोबाईल ट्रॅकिंग सिस्टीम अधिक सुलभ करण्यासाठी देखील याचा फायदा होणार आहे. एकाच व्यक्तीच्या नावावर प्रमाणापेक्षा अधिक सिमकार्ड अलॉट होणे, फेक सिम कार्ड अशा धोक्यांपासून बचावासाठी हा आयडी कामी येणार आहे.

सध्या एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती सिमकार्ड आहेत हे शोधण्यासाठी विविध एलएसए कंपन्यांमध्ये एआय-फेस रिकग्निशन टेक्नॉलॉजीचा वापर करुन ऑडिट करावं लागतं. ही प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ आहे. यामुळे नवीन युनिक आयडी फीचरची संकल्पना समोर आणली आहे.