परीक्षेसाठी आलेल्या विवाहितेला मंगळसूत्र काढायला लावले, कर्नाटकातील धक्कादायक प्रकाराने सर्वत्र संताप

परीक्षा देण्यासाठी आलेल्या महिला उमेदवारांना मंगळसूत्र काढायला लावल्याचा धक्कादायक प्रकार कर्नाटकात नुकताच उघडकीस आला. परीक्षा अधिकाऱ्यांनी कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसणाऱ्या महिला विद्यार्थिनींना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी मंगळसूत्र काढून टाकण्यास सांगितले आहे. त्यामुळे वादाची ठिणगी पडली आहे. मंगळसूत्राव्यतिरिक्त, परीक्षा अधिकाऱ्यांनी महिलांना त्यांचे कानातले, चेन, पैंजण आणि हातातील अंगठ्या असे दागिने काढण्यास सांगितले.

यावर भारतीय जनता पक्षाचे आमदार बसनगौडा यत्नाल यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. महिला उमेदवारांकडून मंगळसूत्र काढणे हे केवळ हिंदूंसाठीच आहे का, असा सवाल बसनगौडा यांनी केला. याशिवाय, अधिकाऱ्यांनी हिजाब परिधान केलेल्या महिलांचीही तपासणी केली, परंतु त्यांना आत प्रवेश देण्यात आला, असे ते म्हणाले.

हिंदू संस्कृतीचा भाग म्हणून महिलांना परीक्षा देताना मंगळसूत्र काढण्याची गरज नाही. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा आम्ही त्यांना काढून टाकतो. मी माझे मंगळसूत्र आणि पैंजण काढून आत गेली. “मुस्लिम महिलांच्या हिजाबची ज्या प्रकारे तपासणी केली गेली आणि परवानगी दिली गेली त्याच प्रकारे आम्हाला तपासले गेले पाहिजे. तसेच परवानगी दिली गेली पाहिजे,” असे एका उमेदवाराने सांगितले.

राज्यातील विविध मंडळे आणि महामंडळांमध्ये पदे भरण्यासाठी उमेदवारांची नियुक्ती करणाऱ्या कर्नाटक परीक्षेत काही विद्यार्थ्यांनी फसवणूक केल्याच्या घटनेनंतर हे घडले आहे. यापूर्वी काही उमेदवार परीक्षा हॉलमध्ये ब्लूटूथ उपकरण वापरताना पकडले गेले होते. कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महिला उमेदवारांचे मंगळसूत्र काढून घेतल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. यावरून राज्यात वाद निर्माण झाला होता.

jalgaonsandesh

jalgaonsandesh