एसडी-सीड शिष्यवृत्ती वितरणासाठी सुपर ३० चे पद्मश्री आनंद कुमार २१ रोजी जळगावात

जळगाव – आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे सुपर ३० चे संस्थापक पद्मश्री आनंद कुमार पटना, बिहार हे २१ नोव्हेंबर रोजी जळगावात येत आहेत. छत्रपती संभाजी महाराज नाट्यमंदिर, महाबळ रोड, जळगाव येथे सायंकाळी ४.३० वा.

एसडी-सीड तर्फे दिल्या जाणाऱ्या १६ व्या मातोश्री प्रेमाबाई जैन उच्च शिक्षण शिष्यवृत्ती सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून ते उपस्थित राहतील व त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार आहे.

या दरम्यान त्यांची प्रकट मुलाखत प्रसिध्द निवेदिका व मुलाखतकार सौ. मंगला खाडिलकर या घेणार आहेत. या मुलाखतीत मा. आनंद कुमार यांनी साधरण कौटुंबिक परिस्थितीतून कसा मार्ग काढला ? तसेच हुशार परंतु आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणाच्या प्रवाहात मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांना आयआयटी ला प्रवेश मिळवून देण्यापर्यंतचा प्रवास तसेच या प्रवासात आलेल्या प्रचंड अडचणींपासून ते पद्मश्री पर्यंत प्रवास सुद्धा उपस्थितांना जाणून घेता येणार आहे.

सदर कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार असून विद्यार्थी, पालक, शिक्षक व प्राध्यापक, विद्यार्थी चळवळीशी संबंधित शिक्षणप्रेमीनी या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन एसडी-सीडने केले आहे.