राज्यातील पहिलाच उपक्रम; एरंडोल शहरात साकारतोय ‘पुस्तकांचा बगीचा’

जळगाव –  देशभरात सर्वत्र वनस्पतींचे बगीचे, फुलांचे बगीचे मोठ्या संख्येने आहेत. मात्र एरंडोल नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी यांच्या संकल्पनेतून पालिकेच्यावतीने शहराबाहेर असलेल्या नवीन वसाहतींमधील आनंदनगर येथील ३३ गुंठे मोकळ्या जागेवर ‘पुस्तकांचा बगीचा’ उभारण्यात येत आहे.

वृद्ध नागरिक, महिला शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचन संस्कृतीत वाढ व्हावी, या उद्देशाने पालिकेतर्फे ‘पुस्तकांचा बगीचा’ उभारण्यात येत आहे. ‘पुस्तकांचा बगीचा’ हा आदर्श उपक्रम राबविणारी एरंडोल नगरपालिका राज्यात पहिलीच पालिका ठरणार आहे.

एरंडोल पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी यांनी शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवून पालिकेची वेगळी ओळख निर्माण केली आहे. राज्यासह देशात वनस्पती, फुले, विविध प्रकारचे झाडे असलेले विविध सार्वजनिक उद्याने आहेत. सार्वजनिक उद्यानांमध्ये व्यायामाची साधने देखील आहेत. परंतु पुस्तकांचा बगीचा उपक्रम कोठेही नाही.

प्रशासक विकास नवाळे यांनी शहरात पालिकेच्यावतीने वेगळा उपक्रम राबविण्याची संकल्पना राबविण्याचे नियोजन केले. शहराबाहेर असलेल्या आनंदनगर येथील ३३ गुंठे मोकळ्या जागेत पुस्तकांचा बगीचा निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू करून ते यशस्वी करण्याचा संकल्प केला. आनंदनगरमधील पालिकेच्या मोकळ्या जागेचे सुशोभीकरण करून त्या ठिकाणी ‘पुस्तकांचा बगीचा’सुरू करण्याचा राज्यातील पहिलाच आदर्श उपक्रम राबवून प्रत्यक्ष कामास सुरुवात केली.

सद्यस्थितीत बगीच्याचे काम देखील अंतिम टप्प्यात आहे. वयोवृद्ध नागरी, महिला, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यात वाचनाची आवड निर्माण व्हावी, तसेच वाचन संस्कृतीत वाढ व्हावी, यासाठी पुस्तकांचा बगीच्याची निर्मिती करण्यात येत आहे. पुस्तकांच्या बगीच्यात वाचकांसाठी विविध प्रकारचे पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. उद्यानात ठिकठिकाणी पुस्तकांसाठी बॉक्स असून, वाचनासाठी आठ वाचन कट्टे बांधण्यात आले आहेत. उद्यानात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली असून, सर्वत्र नैसर्गिक वातावरण निर्माण करण्यात आले आहे.

तसेच सुगंधी फुलझाडांची लागवड करण्यात आल्यामुळे सर्वत्र सुगंधी वातावरणाचा देखील वाचकांना आनंद मिळणार आहे. पुस्तकांचा सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला आहे. उद्यानाच्या संरक्षकभिंतीवर विचारवंत, लेखक यांचे पुस्तकातील विचार चित्रित करण्यात आले आहेत. ठिकठिकाणी कवितांचे पोट्रेट करण्यात आले आहेत. पुस्तक आणि वृक्ष यावर आधारित भित्तीचित्र रंगविण्यात आली आहेत. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेसह पुस्तकांचे भव्य शिल्प उभारण्यात आले आहे.

उद्यानातील मोठ्या वृक्षांखाली पुस्तकांचे बॉक्स असून, वाचक बॉक्समधून पुस्तक घेऊन वाचन कट्ट्यावर बसून वाचनाचा आनंद घेऊ शकणार आहेत. उद्यानात ग्रीनजिमचीही निर्मिती करण्यात आली आहे. वृद्धांसाठी नाना-नानी पार्कची निर्मिती करण्यात आली आहे. उद्यानात लहान बालकांपासून वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन सोयी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

पुस्तकांच्या बगीच्यात कथा, कादंबरी, राष्ट्रीय पुरुषांचे चरित्र्य, कवितासंग्रह, विविध स्पर्धा परीक्षांचे पुस्तके उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच उद्यानात बुक बँक देखील निर्माण करण्यात आली असून, ज्या नागरिकांकडे वाचन झालेली पुस्तके असतील त्यांनी सदर पुस्तके इतरांना वाचनासाठी बुक बँकेमध्ये जमा करावीत, असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहेत.

एरंडोल पालिकेने साकारलेला ‘पुस्तकांचा बगीचा’ हा राज्यातील पहिलाच उपक्रम आहे. सदर बगीचा वाचन संस्कृती वाढविण्यासाठी तसेच संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. बागेची उभारणी सर्वच वयोगटातील वाचकांची उपयोगिता लक्षात घेऊन करण्यात आली आहे. पुस्तकांचा बगीचा हा उपक्रम राज्यासाठी आदर्श ठरणार आहे.

”शहरातील नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचन संस्कृती जोपासली जावी, यासाठी पुस्तक बागेची निर्मिती करण्यात आली आहे. पुस्तक बागेचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच नागरिकांसाठी उद्यान सुरू करण्यात येणार आहे. तसेच नैसर्गिक वातावरणाचा पूर्ण आनंद नागरिकांना घेता येणार आहे.”