मुंबईत विजयादशमीला एकाच पक्षाचे, एका विचाराचे दोन वेगवेगळे मेळावे मुंबईकरांना पाहायला मिळाले. आझाद मैदानावर मुख्यमंत्री शिंदे यांची शिवसेना, तर शिवाजी पार्कवरच्या परंपरागत दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले.
काही अपवाद वगळता या दोन्ही भाषणांतील मुद्दे जवळपास एकसारखे होते.
मात्र गेल्या वेळी शिवाजी पार्कवरून दोन्ही शिवसेनेत कलगीतुरा रंगला होता. मात्र या वादावरून जनतेत उठलेल्या विविध प्रतिक्रिया बघता या वेळी मैदानाचा आग्रह सोडून शिंदे यांनी त्यांच्यातील एका परिपक्व राजकारण्याचा परिचय दिला.
आता स्पर्धा न करता आमचा वेगळा मार्ग आम्ही चोखाळला आहे, हा संदेश या निमित्ताने दिला गेला. नियोजनासाठी या वेळी कमी दिवस मिळाले. मैदानही नवे होते. मात्र तरीही आझाद मैदानासारखे मोठे मैदान गर्दीने तुडुंब भरवण्यात शिंदेंना यश आले.
या वेळी या मेळाव्यासाठी राज्यभरातील, नंदुरबार ते वाशीमसारख्या जिल्ह्यातील गावखेड्यांतून कार्यकर्ते मुंबईत आणण्यात शिंदे यशस्वी झाले. बस, वाहनांची व्यवस्था, कार्यकर्त्यांचे जेवण ते अगदी पार्किंगपासूनचे नियोजन चोख ठेवण्यात आले होते. सभेला गर्दी जमवण्याच्या नियोजनात एकनाथ शिंदे यांचा हातखंडा आहे. या वेळीही त्यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येत होता.
या सभेच्या निमित्ताने शिंदे यांना मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा समाजाला आश्वस्त करण्याची एक मोठी संधी मिळाली. त्याचा पुरेपूर वापर मुख्यमंत्र्यांनी केला असल्याचे बहुतांश राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
या वेळी शिंदे यांचे भाषण दीड तासाचे होते. मात्र भाषणाचा ओघ चांगला होता. ते कुठेही अडखळले नाहीत. आझाद मैदानातील ही आझाद शिवसेना आहे, या सूचक वाक्याने त्यांनी भाषणाची सुरुवात केली. एकनाथ शिंदे यांचे भाषण २०२४ च्या निवडणुकांचा वेध घेणारे होते. यात अंतर्गत मतभेद विसरून एनडीए आघाडीला विजयी करण्यावर त्यांनी भर दिला. नेहमीप्रमाणे काँग्रेस आणि शिवसेना युतीबद्दल बोलून त्यांनी दोन्ही पक्षांतील विचारांचा अंतर्विरोध शिवसैनिकांपुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. वेळ पडली तर ते एमआयएमला सोबत घेतील, असा टोमणा मारून हिंदुत्ववादी भाजपसोबत जाण्याचा निर्णय किती योग्य आणि नैसर्गिक होता, हे त्यांनी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
राज्यात मराठा समाजात आरक्षणावरून मोठी खदखद आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला मिळालेल्या पाठिंब्यावरून ते दिसून आले. मात्र मेळाव्याच्या निमित्ताने मराठा समाजाला आश्वस्त करण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. आरक्षणाची वाट बिकट असली तरी मुख्यमंत्री म्हणून त्यावर मराठा समाजाच्या दुःखावर फुंकर घालणे गरजेचे होते. शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत, इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण आम्ही देणारच, हा माझा शब्द आहे, या भाषेत त्यांनी आरक्षण देण्याबद्दल ते किती प्रामाणिक आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
अलीकडे अनेक घोटाळ्यांप्रकरणी थेट ‘मातोश्री’वर बोट दाखवले जात आहे. यातून मुख्यमंत्री पदाच्या काळातील त्यांची लोकप्रियता कमी करण्याचा एक राजकीय डावपेच आहे. या डावपेचाअंतर्गत एकनाथ शिंदे यांनी ‘मातोश्री’वर १५ कोटी मागण्याचा नवा आरोप केला. यावर काही काळ आरोप-प्रत्यारोपांचा नवा सामना रंगण्याची व्यवस्था त्यांनी केली. या भाषणात त्यांनी राज्य सरकारने हाती घेतलेल्या अनेक प्रकल्प, योजनांचा उल्लेख केला. त्यामध्ये ‘शासन आपल्या दारी’ हे प्रमुख आहे.
विकासाचे विषय घेऊन, आता मुख्यमंत्री म्हणून पुढची वाटचाल करत असल्याचा संदेश या निमित्ताने त्यांनी दिल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. यासोबत अलीकडे न्यायपालिकेकडून आलेले काही निर्णय आणि निरीक्षणे फारसे अनुकूल नसताना न्यायपालिकेवर कुठल्याच पद्धतीने टीका, टिपण्णी न करता विरोधकांपेक्षा आम्ही वेगळे आहोत, हे मुख्यमंत्र्यांनी आपल्या कृतीने दाखवून दिले असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे.
मैदान गर्दीने तुडुंब भरले
आझाद मैदानाची क्षमता एक ते दीड लाखाची असल्याचे पोलिस अधिकारी सांगतात. हे मैदान गर्दीने तुडुंब भरले होते. महत्त्वाचे म्हणजे संध्याकाळी सहानंतर मैदानात प्रत्यक्ष गर्दी जमायला सुरुवात झाली. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू होण्यापूर्वी मैदान पूर्ण भरले होते.
पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, उपस्थितांची संख्या एक ते सव्वा लाख एवढी होती. या सर्व कार्यकर्त्यांसाठी जेवणाची चोख व्यवस्था केली होती. मैदानात अल्पोपहार तर परतीचा प्रवास करणाऱ्यांसाठी ठाणे, नवी मुंबईत जेवणावळी ठेवण्यात आल्या होत्या.