पदवीधर विद्यार्थ्यांना इंटर्नशिप अनिवार्य

यूजीसीकडून नवीन मार्गदर्शक तत्त्वे : येत्या सत्रापासून अंमलबजावणीची योजना

आता पदवीधर विद्यार्थ्यांना इंटर्नशिप अनिवार्यपणे करावी लागणार आहे. यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) नव्या मार्गदर्शक तत्त्वाचा मसुदा तयार करण्यात आला आहे. युजीसीच्या नवीन मसुद्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पदवी अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप अनिवार्यपणे करावी लागेल आणि त्यांना त्याचे गुणांकनही मिळेल. सदर इंटर्नशिप फिजिकल, डिजिटल आणि हायब्रिड मोडवर असेल. तसेच चालू शैक्षणिक सत्रापासूनच त्याची अंमलबजावणी होऊ शकते, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने पदवीधरांना अधिक रोजगारक्षम बनवण्यासाठी इंटर्नशिप अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. ही इंटर्नशिप चौथ्या सेमिस्टरनंतर (दोन वर्षे) किमान 60 ते 120 तासांची असेल. इंटर्नशिपमध्ये विद्यार्थ्यांचा कामाचा अनुभव आणि संशोधन कार्य या दोन्हींचा समावेश असेल. इंटर्नशिप केल्याने विद्यार्थ्याला 2 ते 4 व्रेडिट्स देखील मिळतील. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी)-2020 च्या अनुषंगाने, पदवीधर विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण आणि संशोधन प्रशिक्षणासाठी मसुदा मार्गदर्शक तत्त्वे नुकतीच प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती युजीसीचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी दिली आहे.

प्रायोगिक शिक्षणात विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागासाठी संधी उपलब्ध करून देण्यासाठी पदवीपूर्व (युजी) अभ्यासक्रमांमध्ये संशोधन आणि प्रशिक्षण समाविष्ट करण्यावर भर देण्यात येत आहे. सध्या सर्व पदवी अभ्यासक्रमांसाठी इंटर्नशिप अनिवार्य नाही. हे मुख्यत: तांत्रिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांपुरते मर्यादित आहे. इंटर्नशिपसाठी सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठे डिजिटल पोर्टल तयार करतील. तज्ञ, एजन्सी, उद्योग, संस्था, मार्गदर्शक आणि प्राध्यापक सदस्य नोंदणी करतील आणि पोर्टलवर त्यांचे प्रकल्प सामायिक करतील, असेही कुमार यांनी स्पष्ट केले.

इंटर्नशिप कार्यक्रमाच्या समन्वयासाठी नोडल ऑफिसरची नियुक्ती होणार असून त्यासंबंधी संधी उपलब्ध करण्यासाठी ते स्थानिक संस्था आणि विविध क्षेत्रांशी संपर्क साधतील. नव्या मार्गदर्शक प्रणालीमध्ये ग्रुप इंटर्नशिपचीही तरतूद असेल. विद्यार्थ्यांना उन्हाळा आणि हिवाळ्याच्या सुट्टीत इंटर्नशिप सुरू ठेवण्याचा पर्याय असेल. विद्यार्थी आपली इंटर्नशिप मार्गदर्शक आणि विषय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली किंवा स्वतंत्रपणे करू शकतील. शासकीय व खासगी संस्था, शैक्षणिक संस्था, ऊग्णालये, स्थानिक स्वराज्य संस्था, एनजीओ, स्टार्टअप्स, बिझनेस हाऊस, कौशल्य कार्यशाळा आणि शेतीशी संबंधित विविध क्षेत्रात इंटर्नशिप करता येते.

इंटर्नशिप ‘व्रेडिट’चा अर्थ

इंटर्नशिपसाठी एक व्रेडिटसाठी 30 तास काम किंवा संशोधन करावे लागेल. 15-आठवड्यांच्या सेमिस्टरमध्ये दर आठवड्याला दोन तास इंटर्नशिप असू शकते. चार वर्षांच्या अंडर ग्रॅज्युएट प्रोग्रामच्या (संशोधनासह ऑनर्स) विद्यार्थ्यांना आठव्या सेमिस्टरचे शेवटचे सहा महिने म्हणजे चौथ्या वषी इंटर्नशिपमध्ये घालवावे लागतील. नवीन मसुदा मार्गदर्शक तत्त्वांनुसार चौथ्या सेमिस्टरनंतर यूजी पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 60 ते 120 तासांचे प्रशिक्षण अनिवार्य असेल, असे जगदीश कुमार यांनी सांगितले.

शिक्षण संस्थांना दिशानिर्देश

युजीसीने विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांना शैक्षणिक शुल्क संरचना आणि परतावा धोरण, वसतिगृह सुविधा, शिष्यवृत्ती, रँकिंग आणि अधिकृत मान्यता यांचा तपशील आपल्या वेबसाईटवर जाहीर करणे बंधनकारक केले आहे. उच्च शिक्षण नियामकाने विचार केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. सद्यस्थितीत ही मूलभूत माहिती अनेक विद्यापीठांच्या वेबसाईटवर उपलब्ध नसल्यामुळे युजीसीने सदर दिशानिर्देश जारी केले आहेत.