केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या जीवनावर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाले.
त्यानंतर आता या चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे. यात नितीन गडकरी यांची भूमिका राहुल चोपडाने साकारली आहे. मात्र त्याचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीत उतरला नसल्याचे दिसत आहे.
‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ अशी ओळख असणाऱ्या नितीन जयराम गडकरी यांच्या जीवनावर आधारित ‘गडकरी’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरची सुरुवात ‘गडकरी’ ते ‘रोडकरी’ या प्रवासाने होते. बालपण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सेवक, निवडणुकीचा पराभव, जीवघेणा हल्ला, समाजकारण या सर्व पैलूंची झलक गडकरी या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे. त्याबरोबरच भारतातील पहिला एक्सप्रेस वे, कमीत कमी खर्चात बांधण्याचा निर्णय आणि त्यासाठी करावी लागलेली धडपड याचा प्रवासही यात दिसत आहेत.
मात्र या चित्रपटावर अनेक प्रेक्षक तसेच चाहते नाराजी व्यक्त करत आहेत. या चित्रपटात अभिनेता राहुल चोपडा हा नितीन गडकरींच्या भूमिकेत झळकत आहे. पण यावरुन त्याला ट्रोल करण्यात येत आहे. “या चित्रपटातील प्रमुख भूमिका पंकज त्रिपाठी किंवा परेश रावल हे अधिक चांगल्या पद्धतीने हे पात्र साकारु शकले असते”, अशी कमेंट एकाने केली आहे.
तर एकाने “गडकरींच्या नावाला शोभणारा चित्रपट बनवायला पाहिजे होता. मोठा अभिनेता पाहिजे होता किंवा प्रवीण तरडे यांनी चित्रपट बनवायला पाहिजे होता धर्मवीर सारखा बिग बजेट”, असे म्हटले आहे. “हा चित्रपट मोठ्या स्तरावर आणि मोठ्या कलाकाराला घेऊन बनवायला हवा होता. कारण गडकरी हे राष्ट्रीय नेते आहेत. परेश रावल हे या चित्रपटात अगदीच चांगले वाटले असते”, अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकाने “Big budget पाहिजे होता… चेहरे सगळे अनोळखी आहेत”, असे म्हटले आहे. तसेच एकाने “गडकरी कमी फडणवीस जास्त दिसत आहे”, असे म्हटले आहे.
‘गडकरी’ चित्रपटाच्या ट्रेलरवर कमेंट
दरम्यान नितीन गडकरी यांच्या जीवनावर आधारित ‘गडकरी’ या चित्रपटाच्या ट्रेलरला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. तसेच यातील कलाकार आणि राहुल चोपडावरही प्रेक्षक नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.
अभिजीत मजुमदार आणि ए एम सिनेमा प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित ‘गडकरी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केले आहे. यात नितीन गडकरी यांची भूमिका राहुल चोपडा यांनी साकारली आहे. तसेच या चित्रपटात ऐश्वर्या डोरले, अभिलाष भुसारी, पुष्पक भट, अभय नवाथे, वेदांत देशमुख, तृप्ती प्रमिला काळकर हे कलाकारही झळकणार आहेत. येत्या २७ ॲाक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.