मुंबई – सध्याच्या चित्रपटांचे यश पाहता एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित बायोपिक्सना प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळत आहे. शिवराज अष्टकातील प्रत्येक सिनेमाला प्रेक्षकांची गर्दी होते, तर दुसरीकडे राजकारण्यांच्या जीवनावर आधारित सिनेमांना देखील प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देत आहेत. ‘ठाकरे’ या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावर आधारित सिनेमाला यश मिळाल्यानंतर धर्मवीर आनंद दिघेंच्या ‘धर्मवीर’ या सिनेमानेही लोकांचा तुफान प्रतिसाद मिळवला. ‘धर्मवीर २’ या चित्रपटाचीही घोषणा झाली असून त्यासाठीही प्रेक्षक तितकेच उत्सुक आहेत. त्यातच आता आणखी एका राजकारण्याच्या जीवनकहाणीवर आधारित नवाकोरा बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे राजकारणी म्हणजे ‘हायवे मॅन नितीन गडकरी’ भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वाधिक काळ काम करणाऱ्या नितीन गडकरींच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट २७ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे अक्षय अनंत देशमुख निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केले आहे. या चित्रपटात नितीन गडकरींची मुख्य भूमिका कोण साकारणार हे मात्र गुपित आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आता याची उत्सुकता लागली आहे.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अनुराग भुसारी म्हणतात, “नितीन गडकरी यांची राजकारणातील कारकीर्द निश्चितच उल्लेखनीय आहे. अभ्यासू, प्रभावी वक्ता, कणखर, निरपेक्ष विचार करणारा नेता, रस्ता सुधारणा प्रवर्तक या त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या या विविध बाजू जनतेला माहितच आहेत. समाज कल्याणाचा ध्यास असणाऱ्या या नेत्याचा राजकारणातील प्रवास तसा अनेकांना माहित आहे. मात्र त्यांचे वैयक्तिक आयुष्य व तरुण काळ तितकाच रंजक आहे. अशा या नेत्याचा जीवनप्रवास प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.” या चित्रपटाचे अनुराग भुसारी आणि मिहिर फाटे सहनिर्माते आहेत. सर्व प्रेक्षकांना आता ‘गडकरी’ चित्रपटाचा ट्रेलर आणि टीझर पाहण्याची उत्सुकता लागली आहे.