बिगुल वाजला ! राज्यातील 2,359 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, आचारसंहिता लागू

जळगाव – : राज्यातील सुमारे 2359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. तसेच 2,068 ग्रामपंचायतीमधील 2,950 सदस्यपदाच्या तर 130 सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकाही होणार आहेत. मतदानाची तारीख 5 नोव्हेंबर 2023 असून, ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात मंगळवारी (ता. 3) आचारसंहिता सुद्धा लागू झाली आहे.

निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार 16 ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. या नामनिर्देशन पत्रांची छाननी 23 ऑक्टोबरला होईल. 25 ऑक्टोबर दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. 25 ऑक्टोबरलाच निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. 5 नोव्हेंबरला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. गडचिरोली आणि गोंदिया या भागात सकाळी 7.30 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल आणि 7 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल.

जळगाव जिल्ह्यातही होणार निवडणूक :

जळगाव जिल्ह्यातही 167 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका तर 81 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत 128 रिक्त पदांसाठी निवडणूका होणार आहेत. 5 नोव्हेंबर 2023 रोजी या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh