गुलाबराव पाटील सरकारला घरचा आहेर देण्याच्या तयारीत; छेडणार आंदोलन

जळगाव – मराठा, धनगर, ओबीसी समाजांच्या आंदोलनातून मार्ग काढताना सरकारची चांगलीच दमछाक झाली आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने यंत्रणा कामाला लावलेली आहे. यातून बाहेर पडते ना पडते तोच सरकारला पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील घरचा आहेर देण्याच्या तयारीत आहेत.

पीकविमा कंपन्यांविरोधात आक्रमक झालेल्या पाटलांनी मोर्चा काढून आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापणार असल्याचे बोलले जात आहे.

जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीने रावेर, यावल, सावदा, चोपडा परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांना माहिती देऊनही अद्यापही त्यांना नुकसानभरपाई दिलेली नाही. त्यामुळे आता या विमा कंपन्यांना शिंगाडे दाखविण्याची वेळ आली आहे, असा इशारा मंत्री गुलाबराव पाटलांनी दिला आहे. शेतकऱ्यांना पीकविमा मिळत नसल्याने पाटील यांनी शिंगाडे मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

जळगाव जिल्ह्यात ८१ हजार ६७२ हेक्टर क्षेत्रात ७७ हजार ९२० शेतकऱ्यांनी अॅग्रिकलचर इन्शुरन्स कंपनीकडून विमा काढला. हे सर्व शेतकरी वीमा रकमेस पात्र आहेत. नुकत्याच झालेल्या नियोजन मंडळाच्या बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पडताळणी न करता शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, विमा कंपन्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट विमा कंपन्यांना शिंगाडे दाखविणार असल्याचे बोलले आहेत. तसेच शेतकऱ्यांना तातडीने भरपाई न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

आता खुद्द मंत्रीच विमा कंपनीविरोधात आक्रमक झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का, याकडे लक्ष लागले आहे. तसेच शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री असलेल्या गुलाबराव पाटलांनी दिलेल्या या इशाऱ्यामुळे महायुतीत सरकार काय भूमिका घेणार, याचाही उत्सुकता आहे. शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी पाटलांनी रस्त्यावर उतरण्याची भाषा केल्याने प्रशासनाची धावपळ होणार आहे, यात मात्र काही शंका नाही.

 

jalgaonsandesh

jalgaonsandesh