जळगावहून ‘बोईंग’ सुरू होण्याचा मार्ग मोकळा; ‘हा’ रस्ता बंद करण्यास शेतकऱ्यांची संमती

जळगाव – विमानतळाचे विस्तारीकरणात मोठे विमान (बोइंग) सुरू करण्यास अडचण ठरणारा कुसूंबा ते नशिराबाद रस्ता बंद करण्यास शेतकऱ्यांनी संमती दिली आहे.

यामुळे आता लवकरच जळगाव विमानतळावर मोठ्या विमानांना उतरण्यास व उड्डाण घेण्यास आवश्‍यक असलेली धावपट्टी करता येईल.

नंतर लागलीच बोईंग विमान सुरू होवून अनेक महिन्यापासून बंद असलेली विमान सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

चिंचोली (ता. जळगाव) येथील विमानतळावरून अनेक महिन्यांपासून विमानसेवा बंद होती.

जळगावच्या विमानतळावर रात्री विमाने उतरण्यास, विशेषत: बोईंगसारखी मोठी विमाने उतरण्यास धावपट्टी नसल्याने विमान कंपन्या सेवा देण्यास उत्सूक नाहीत. यामुळे धावपट्टी वाढविण्यासाठी कुसूंबा ते नशिराबाद रस्ता बंद करावा लागणार होता. मात्र, त्यास वीस शेतकऱ्यांनी हरकत घेतली होती. यामुळे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ही बाब पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना सांगितली. त्यांनी शेतकऱ्यांना विश्‍वासात घेवून ना हरकत मिळण्यासाठी प्रयत्न केले. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या. त्यांचे हेच प्रयत्न आता कामी आले असून, शेतकऱ्यांनी नशिराबाद ते कुसूंबा रस्ता बंद करण्यास परवानगी दिली. यामुळे आता विमानतळाची धावपट्टी वाढण्यास मदत होणार आहे.

भाडे कमी राहील

धावपट्टी वाढल्यास ‘बोईंग’सारखी मोठे विमान जळगावला सेवा देवू शकतील. यामुळे भाडेही कमी राहील. सर्वसाधारणपणे सर्वांनाच भाडे परवडणारे असेल. यामुळे विमानसेवेला मागणी होईल. विमान कंपन्या विमाने येथे आणण्यास धजावतील. नागरिकांचा मुंबई, पुणे व इतर ठिकाणी जाण्याचा वेळ वाचेल, अशी माहिती जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दिली.

प्रांताधिकाऱ्यांचे सुटीतही काम

गेल्या शुक्रवारपासून (ता. २९) सलग पाच दिवस शासकीय कार्यालयांना सुट्या असल्या, तरी प्रांताधिकारी महेश सुधळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुटीच्या दिवशीही नशिराबादच्या शेतकऱ्यांना पुन्हा भेटी दिल्या. नशिराबादचया शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पंधरा किलोमिटरचा फेरा करावा लागणार होता.यामुळे त्यांनी पर्यायी रस्त्याची मागणी केली होती. त्यानूसार त्यांना हवा असलेला पर्यायी रस्ता प्रांताधिकारी व टीमने शोधून दिला. यात बांधकाम विभागालाही सहभागी करून घेण्यात आले होते. सोमवारी (ता. २) सर्व शेतकऱ्यांची बैठक बोलावून प्रांताधिकारी सुधळकर यांनी त्यांची रस्ता बंद करण्यास संमती मिळविली.

jalgaonsandesh

jalgaonsandesh