आपली ओळख पटवून देण्यासाठी जे महत्त्वाचे दस्तऐवज पुरावा म्हणून दाखवले जातात, त्यात प्रामुख्याने आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्राचा समावेश असतो. पण, आता लवकरच जन्म प्रमाणपत्राचं महत्त्व खूप वाढणार आहे. कारण देशभरात 1 ऑक्टोबर 2023 पासून जन्म आणि मृत्यूची नोंदणी (सुधारणा) कायदा, 2023 लागू होणार असून त्यात जन्म प्रमाणपत्र हा एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरणार आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयानं काही दिवसांपूर्वी एक अधिसूचना जारी करून यासंदर्भात घोषणा केली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी गेल्या महिन्यात संपलेल्या पावसाळी अधिवेशनात जन्म आणि मृत्यू नोंदणी (सुधारणा) विधेयक, 2023 मंजूर केलं होतं. यामध्ये 1962 च्या कायद्यात दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली होती. हे विधेयक 1 ऑगस्ट रोजी लोकसभेत आणि 7 ऑगस्ट 2023 रोजी राज्यसभेत मंजूर करण्यात आलं. यानंतर केंद्र सरकारने याबाबत अधिसूचना जारी करून 1 ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू करण्यात येणार असल्याचे जाहीर केलं आहे.
त्यानुसार आता जन्माचा दाखला हा शाळेचा प्रवेश दाखला , कॉलेज प्रवेश , ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करताना, मतदार यादीत नाव समाविष्ट करताना, आधार नोंदणी, विवाह नोंदणी किंवा सरकारी नोकरीच्या अर्जासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर आधारपासून सर्व आवश्यक कागदपत्रे बनवण्यात जन्म प्रमाणपत्राची भूमिका वाढणार आहे. तुम्ही आधारपासून ड्रायव्हिंग लायसन्सपर्यंतची सर्व आवश्यक कागदपत्रे कोणत्याही अडचणीशिवाय फक्त जन्मदाखल्यावर मिळू शकणार आहेत.
जन्म-मृत्यू नोंदणीच्या नियमांमध्ये बदल करण्यामागील मुख्य उद्देश केंद्र आणि राज्य स्तरावर जन्म-मृत्यूचा डेटाबेस तयार करणे हा आहे. हा नियम लागू झाल्यानंतर राज्य आणि केंद्र सरकार आपापसात जन्म आणि मृत्यूची आकडेवारी सहज शेअर करू शकणार आहे. यासाठी राज्यांकडून मुख्य निबंधक आणि निबंधक नियुक्त केले जाणार आहेत.