जळगाव – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ रविवारी जळगावात धडाडणार आहे. पिंप्राळा येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि जळगाव मनपातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यांचे अनावरण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असून, मानराज पार्क मैदानावर दुपारी 12 वाजता वचनपूर्ती सभा होणार आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सकाळी विमानाने जळगाव येथे आगमन होणार असून त्यांच्यासमवेत शिवसेना नेते खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आदींची उपस्थिती राहणार आहे. जळगाव महापालिकेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता होणार आहे. त्यानंतर 11.45 मिनिटांनी पिंप्राळा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार असून, तेथेच मानराज पार्कच्या मैदानावर दुपारी 12 वाजता वचनपूर्ती सभा होणार असल्याची माहिती संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी दिली.
शिवसेना पदाधिकार्यांकडून सभास्थळाची पाहणी
शहरातील पिंप्राळा येथील मानराज पार्क येथील मैदानावरील सभास्थळाची शनिवारी शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, उपमहापौर कुलभूषण पाटील, युवा सेनेचे विराज कावडिया व गजानन मालपुरे आदी पदाधिकार्यांनी पाहणी केली.