गेल्या चार आठवड्यांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने राज्यभरात हळूहळू सक्रिय होण्यास सुरुवात केली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मुंबईतील अनेक ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून रिमिझिम पाऊस होत आहे.
त्यामुळं सामान्यांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यातच आता हवामान खात्याने शेतकऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. पुढील चार ते पाच दिवस मान्सूनसाठी अत्यंत अनुकूल असतील. त्यामुळं हवामान खात्याने महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वीजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. दुसरीकडे कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
पुढील चार ते पाच दिवसांत राज्यातील बहुतांश भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. प्रामुख्याने विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, यवतमाळ, भंडारा, अकोला, अमरावती आणि मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. दोन्ही विभागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा अंदाज असल्याने काही ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. याशिवाय मुंबई, पुण्यासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आयएमडीकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं आता पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या बळीराला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला होता. त्यानंतर संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेला आहे. परिणामी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामातील पीकं करपण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळं आता येत्या दोन ते तीन दिवसांत वरुणराजाचं आगमन झालं तर ते पिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरणार आहे. याशिवाय उकाड्याने हैराण झालेल्या शहरी भागातील नागरिकांनाही मोठा दिलासा मिळेल.